प्रवाशांना लुबाडणारे सहा पोलीस निलंबित

रेल्वे स्थानकावर साहित्य तपासणीच्या नावाखाली प्रवाशांना लुबाडणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळू पाटोळे (एलसीबी, पुणे लोहमार्ग), पोलिस हवालदार सुनील व्हटकर (एलसीबी, पुणे लोहमार्ग), पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यातील प्रशांत बजरंग डोईफोडे, जयंत गणपत रणदिवे, अमोल युवराज सोनवणे आणि विशाल दत्तात्रेय गोसावी अशी निलंबित केलेल्या सहा पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 7 Apr 2023
  • 09:27 am
प्रवाशांना लुबाडणारे  सहा पोलीस निलंबित

प्रवाशांना लुबाडणारे सहा पोलीस निलंबित

तपासणीच्या नावाखाली पाच लाखांची वसुली केल्याचा ठपका

#पुणे स्टेशन

रेल्वे स्थानकावर साहित्य तपासणीच्या नावाखाली प्रवाशांना लुबाडणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळू पाटोळे (एलसीबी, पुणे लोहमार्ग), पोलिस हवालदार सुनील व्हटकर (एलसीबी, पुणे लोहमार्ग), पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यातील प्रशांत बजरंग डोईफोडे, जयंत गणपत रणदिवे, अमोल युवराज सोनवणे आणि विशाल दत्तात्रेय गोसावी अशी निलंबित केलेल्या सहा पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

पुणे रेल्वे स्थानकावर घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांकडे प्रवाशांचे साहित्य तपासण्याचे काम होते. त्यांनी तीन एप्रिल रोजी दुपारी एका तरुणासह त्याच्या मैत्रिणीला अडवले. त्यांच्या बॅगेत गांजा असल्याच्या संशयावरून त्यांची चौकशी केली. या दोघांना लोहमार्ग पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांसमोर हजर केले. त्याची स्टेशन डायरीत नोंद करून त्यांना सायंकाळी सोडून दिले. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी तरुण आणि त्याच्या मैत्रिणीकडून पाच लाख रुपये घेतले, अशी माहिती मुंबईच्या लोहमार्ग पोलिस महासंचालक कार्यालयातून लोहमार्ग पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांना कळवण्यात आली. बनसोडे यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक इरफान शेख यांना दिले. त्यानुसार रेल्वे फलाटावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले. चौकशीनंतर पोलिस अधीक्षक बनसोडे यांनी या सहा कर्मचाऱ्यांवर बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. निलंबित कर्मचाऱ्यांपैकी एकावर यापूर्वीही प्रवाशांचे साहित्य तपासणीत गैरप्रकार केल्यामुळे जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. तरीही त्याची पुन्हा रेल्वे स्थानकात नियुक्ती केल्याचे समोर आले आहे.

यापूर्वी सात पोलिस बडतर्फ

या निलंबित कर्मचाऱ्यांकडे अनेक महिन्यांपासून प्रवाशांचे साहित्य तपासणीचे काम होते. त्यांना कोणाच्या सांगण्यावरून हे काम दिले गेले, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. तसेच, विशेष म्हणजे जून २०२१ मध्ये अंमली पदार्थ प्रकरणात गैरप्रकार केल्याप्रकरणी तत्कालीन वरिष्ठ निरीक्षकांसह सात पोलिसांना बडतर्फ केले होते. या घटनेवरून प्रवाशांना लुबाडण्याचे काम सुरूच असल्याचे समोर आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story