रंगाने केली पंचमी बेरंगी

आज-काल गुन्हा करायलाही कल्पकतेचा वापर करायला लागतो. अशाच एका घटनेत रविवारी रंगपंचमीच्या दिवशी रंगाने चेहरा झाकून एका वृद्धेच्या गळ्यातील ८० हजारांचा सोन्याचा हार लंपास केला. मात्र, पोलिसांतही कल्पक आणि शोधवृत्ती असलेले कर्मचारी असल्याने त्यांनी लंपास हार जप्त केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 14 Mar 2023
  • 12:09 am
रंगाने केली पंचमी बेरंगी

रंगाने केली पंचमी बेरंगी

खरा चेहरा रंगाने लपवत आरोपीने वृद्धेला केला रंग लावण्याचा बहाणा, हिसकावला वृद्धेच्या गळ्यातील सुवर्णहार, पोलिसांनीही काढला रंगावरूनच माग

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

आज-काल गुन्हा करायलाही कल्पकतेचा वापर करायला लागतो. अशाच एका घटनेत रविवारी रंगपंचमीच्या दिवशी रंगाने चेहरा झाकून एका वृद्धेच्या गळ्यातील ८० हजारांचा सोन्याचा हार लंपास केला. मात्र, पोलिसांतही कल्पक आणि शोधवृत्ती असलेले कर्मचारी असल्याने त्यांनी लंपास हार जप्त केला.      

धनकवडी येथील चैत्यन्यनगरमध्ये ७२ वर्षीय आशा रमेश सुखदेव या ज्येष्ठ महिला राहतात. रविवारी, म्हणजे १२ तारखेला, रंगपंचमीच्या दिवशी त्या सकाळी साडेआठच्या दरम्यान नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. घरापासून जेमतेम पाचशे मीटर अंतरावर आल्या असता त्यांना एका अनोळखी तरुणाने अडवले. "थांबा, आज्जी आज रंगपंचमी आहे, मी तुम्हाला रंग लावतो"  म्हणत गप्पा मारत-मारत त्याने चेहऱ्याला रंग लावला. रंग चेहऱ्यावर माखल्याने त्यांनी डोळे मिटून घेतले. ही संधी साधून चोराने गळ्यातील ८० हजारांचा  सोन्याचा हार शिताफीने  क्षणात लांबवला. हा प्रकार ज्येष्ठ महिलेच्या लक्षात येण्याआधीच तो तेथून पसार झाला. आपल्या गळ्यातील किमती दागिना पळवल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आरडा-ओरडा करायला सुरुवात केली. लोक जमल्यावर त्यांना हा प्रकार कळेपर्यंत तो पसार झाला होता.

ज्येष्ठ महिलेने सहकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी तपासास सुरुवात केली. पोलिसांनी चैतन्यनगर परिसरातील खबऱ्यांकडून माहिती घेतली. या वेळी मिळालेल्या माहितीच्या आधारावर  संशयिताच्या शोधास सुरुवात झाली. त्यातल्या एकाच्या घरी पाहणी केली असता गुन्ह्याचे धागे-दोरे मिळाले. संशयिताच्या दारातच रंग सांडलेला होता.

 रंग भरलेली पुढीही आढळून आली. दारात सांडलेला रंग आणि महिलेच्या चेहऱ्याला असलेला रंग एकच असल्याचे आढळून आल्याने संशय बळावला. पोलिसांनी अधिक माहिती घेतल्यावर समजले की आरोपीने पांढऱ्या रंगावर काळ्या रंगाच्या फुलांची नक्षी असलेला फुल बाहीचा शर्ट, आणि काळी पँट घातलेला आहे. तो अंदाजे २० ते २२ वयाचा आहे. या वर्णनाची व्यक्ती बालाजीनगर येथील पवार हॉस्पिटलच्या बाहेरील रिक्षा स्टॅण्डजवळ आढळून आली. खात्री होताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याचे नाव विक्रम माणीक पारखे (वय २१) असे असून तो रवी पोळ बिल्डिंग, चौथा मजला, फ्लॅट नं. १, तुळजा भवानी मंदिरामागे, बालाजीनगर येथे राहतो. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्या ताब्यातील ८० हजारांचा सोन्याचा हार जप्त केला आहे. त्याच्यावर भारतीय दंड विधानातील कलम ३९२ नुसार चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. सहकारनगर पोलिसांनी शिताफीने एका दिवसात चोरीला गेलेला हार शोधून काढल्याने आणि चोराला अटक केल्याने  ज्येष्ठ महिला आशा सुखदेव या आनंदी झाल्या.

 गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस निरीक्षक समीर शेंडे, हवालदार भुजंग इंगळे, संजय गायकवाड आदींनी केला. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story