नदीसुधारच्या वृक्षतोडीवरून सुंदोपसुंदी
नितीन गांगर्डे
नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये जुन्या आणि दुर्मीळ वृक्षांचा समावेश नाही. तरीही प्रकल्पात सहा हजारांपेक्षा जास्त झाडे तोडली जाणार असल्याची माहिती समाजमाध्यमांवर फिरत आहे. त्यामुळे ही माहिती चुकीची असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले असून, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही नागरिकांना केले आहे, तसेच या प्रकल्पांतर्गत नदीच्या दुतर्फा ६५ हजारांपेक्षा जास्त झाडे लावण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, प्रस्तावित वृक्षतोडीची नदीसुधार प्रकल्पासाठी गरजच नाही, असे पर्यावरणवादी कार्यकर्ते व संघटनांचे
म्हणणे आहे. त्यामुळे या प्रश्नावरून आता सुंदोपसुंदी निर्माण झाली आहे.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या झाडांचे पालिकेने सर्वेक्षण केले होते. ते करताना संख्या मोजता यावी यासाठी झाडांना एक फलक लावून त्यावर क्रमांक घालण्यात आले होते. मात्र, समाजमाध्यमांवर या फलकांबाबत गैरसमज पसरवला जात आहे. ज्या ज्या झाडांवर फलक आहेत, ते सर्व तोडले जाणार आहेत अशा स्वरूपाचा संदेश समाजमाध्यमातून फिरत आहे. मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नसून हे फलक केवळ सर्वेक्षणाचा भाग आहे. त्यामुळे अफवांना बळी पडू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुणे महानगरपालिका मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबवत आहे. या कामाची सुरुवात संगम ब्रिज ते बंडगार्डन आणि बंडगार्डन ते मुंढवा या मार्गावर झाली आहे.
बाधित होणाऱ्या झाडांच्या बदल्यात नदीच्या दोन्ही काठांवर स्थानिक प्रजातीच्या ६५ हजारांपेक्षा जास्त वृक्षांचे रोपण पुणे महानगरपालिका करणार आहे. यामुळे नदीकाठच्या परिसंस्था सुधारण्यासाठी मदत होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तज्ज्ञांनी सुचवलेली व नदीकाठ परिसंस्थेला सुसंगत असलेली योग्य उंचीची झाडे लावली जाणार आहेत. यामध्ये आंबा, जांभूळ, करंज, अर्जुन, मुचकुंद, गुलार, कैलासपती, निम आदी वृक्षांचा समावेश असेल. यामध्ये लावण्यात येणारे गवत आणि वृक्ष स्थानिक प्रजातीचे असतील, या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. ही झाडे हवामान बदल, पूरपरिस्थिती, संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि इतर सूक्ष्म बदलांना तोंड देण्यास सक्षम असतील. नदीकाठाची होणारी झीज टाळण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी, जैवविविधता वाढीसाठी, पक्ष्यांना निवासस्थाने निर्माण करण्यासाठी, नदीमध्ये जलचरांच्या वाढीसाठी उपयोगी ठरणारी असतील.
प्रस्तावित वृक्षतोड
या प्रकल्पात जी झाडे तोडली जाणार आहेत त्यामध्ये जुन्या आणि दुर्मीळ वृक्षांचा समावेशच नाही. यामध्ये बाभूळ, सुबाभूळ, कुबाभूळ, काटेरी बाभूळ, विलायती किकर, विलायती चिंच अशी झाडे आहेत. संगमवाडी ते बंडगार्डन या टप्प्याचे काम करत असताना बाधित होणाऱ्या एकूण झाडांपैकी एक हजार ५३८ झाडे संपूर्णतः तोडण्याचे प्रस्तावित आहे. त्यांपैकी बाभूळ ४४१, सुबाभूळ ८०४ आणि विलायती बाभूळ, विलायती किकर ४८९ अशी सुमारे १ हजार ५३४ झाडे आहेत. याशिवाय खैर २, निलगिरी २ असे चार वृक्ष तोडण्यात येणार आहेत. बंडगार्डन ते मुंढवा या टप्प्यात १ हजार ५७२ झाडे तोडणे प्रस्तावित आहे. या टप्प्यात बाभूळ ४२०, रेन ट्री ६६, निलगिरी ४, सुबाभूळ ४१६, आंबा ४३, अशोक १, नारळ ४३, विलायती बाभूळ, विलायती किकर, विलायती चिंच ५७९ अशी वृक्षतोड प्रस्तावित आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.