सुपेंचे ६५ लाखांचे दागिने परत करा
सीविक मिरर ब्यूरो
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेले राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त करण्यात आलेले ६५ लाख १३ हजार ८०० रुपयांचे दागिने सुपे कुटुंबीयांना परत करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी शुक्रवारी (दि. २४) दिले.
टीईटी गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने तुकाराम सुपे यांना १७ डिसेंबर २०२१ रोजी अटक केली होती. अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. या प्रकरणात सुपे यांना अटक करण्यात आली होती. सुपे यांचा जावई, मुलगा आणि नातेवाईकांचीही पोलिसांनी चौकशी केली होती. त्यानंतर सुपे यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते.
सुपे यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सुपे कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांकडून दोन कोटी ६४ लाखांची रोकड आणि ६५ लाख १३ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले होते. सुपे यांच्या पत्नीने बँकेत ठेवलेल्या मुदतठेवीच्या पावत्या तसेच जमीन खरेदी प्रकरणातील कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती.
या प्रकरणात सुपे यांच्यासह तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह १५ आरोपींच्या विरुद्ध ३,९९५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सुपे कुटुंबीयांच्या घरातून १९ डिसेंबर २०२१ रोजी ६५ लाख १३ हजार ८०० रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले होते. मात्र हे दागिने सुपे कुटुंबीयांना परत करण्यात यावे, असा अर्ज त्यांचे वकील ॲड. मिलिंद पवार आणि ॲड. अक्षय शिंदे यांनी न्यायालयात सादर केला होता.
सुपे कुटुंबीयांच्या घरातून जप्त करण्यात आलेले दागिने त्यांच्या मालकीचे तसेच वापरातील आहेत. जप्त करण्यात आलेले दागिने सुपे यांची पत्नी, मुलगी, मुलगा, सून, जावई यांचे आहेत. जप्त केलेले दागिने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. दागिने पोलीस ठाण्यात पडून राहिले तर नुकसान होईल. खटल्याचा निकाल लागेपर्यंत जप्त दागिने आहे तसेच ठेवू, अशी हमी बंधपत्राद्वारे (बाॅंड) न्यायालयात दिली जाईल. सुपे कुटुंबीयांचे दागिने परत करावे, अशी विनंती ॲड. पवार आणि ॲड. शिंदे यांनी सुपे कुटुंबीयांच्या वतीने युक्तिवादात केली. बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी सुपे कुटुंबीयांकडून जप्त करण्यात आलेले दागिने परत करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.