निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांचा गंडा

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक करण्याचे सत्र कायम असून, शहरात अशा घटनांची नोंद सातत्याने होत आहे. याच मालिकेत एक नवीन गुन्हा उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत एका ७१ वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने सायबर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 9 Jun 2023
  • 12:57 am
निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांचा गंडा

निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांचा गंडा

ध्वनिचित्रफितींना 'लाइक्स' मिळवून दिल्यास पैसे देण्याचे चोरट्यांचे आमिष

#पुणे 

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक करण्याचे सत्र कायम असून, शहरात अशा घटनांची नोंद सातत्याने होत आहे. याच मालिकेत एक नवीन गुन्हा उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत एका ७१ वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने सायबर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार निवृत्त कर्नल आहेत. समाजमाध्यमातून चोरट्यांनी त्यांना एक संदेश पाठविला होता. समाजमाध्यमातील ध्वनिचित्रफितींना 'लाइक्स' मिळवून दिल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष चोरट्यांनी भासवले होते. चोरट्यांनी सुरुवातीला त्यांच्या बँक खात्यात काही पैसे जमा केले. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. चोरट्यांनी त्यांच्याशी पुन्हा संवाद साधला. त्यांना ऑनलाइन टास्क योजनेत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी दिलेल्या १८ बँक खात्यात वेळोवेळी विविध रक्कम भरायला सांगून एकूण दोन कोटी रुपये जमा केले. 

लष्करी अधिकाऱ्याने निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम, तसेच साठवलेली रक्कम चोरट्यांच्या खात्यात ४१ व्यवहारांद्वारे जमा केली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. फसवणूक झाल्यानंतर सुरुवातील लष्करी अधिकाऱ्याने कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली नव्हती. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चोरट्यांनी लष्करी अधिकाऱ्याला ज्या बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले होते. ती बँक खाती तसेच रक्कम गोठविण्याची विनंती पोलिसांनी बँकेकडे केली आहे, असे सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांनी सांगितले.

feedback@civicmirror.in

Share this story