मंडळांत मानापमान नाट्य रंगले ; बैठकीवर बहिष्कार
महेंद्र कोल्हे
पुण्यात गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. या सोहळ्याची तयारी करण्यासाठी बुधवारी पुणे पोलिसांनी गणेश मंडळांच्या बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकीत पुणे पोलिसांनी मानाचे आणि इतर गणेश मंडळात दुजाभाव केल्याचे समोर आले. शहरातील मानाच्या गणपतींची स्वतंत्र तर इतर मंडळांना वेगळी वेळ दिल्याने इतर गणेश मंडळांनी पुणे पोलिसांच्या या कृतीचा निषेध केला. तसेच इतर प्रमुख मंडळांनी पुणे पोलिसांच्या बैठकीवर बहिष्कार घातला.
पुणे पोलीस हे शहरातील गणेश मंडळात भेदभाव करत असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला. नियोजनाच्या बैठकीबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करीत इतर मंडळांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपल्याने त्याच्या नियोजनासाठी बुधवारी पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार मध्य भागातील महत्त्वाच्या ३० ते ४० मंडळांचे कार्यकर्ते दुपारी १२ च्या सुमारास आयुक्तालयात दाखल झाले. मात्र दुपारचा एक वाजला तरी बैठक सुरू न झाल्याने पदाधिकाऱ्यांनी नेमकी बैठक कधी सुरू होणार याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांना समजले की, सकाळी दहा वाजताच शहरातील मानाचे पाच गणेश मंडळ आणि प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीला उशीर झाल्याने १२ वाजताची मिटिंग लांबली. ही बाब लक्षात आल्यानंतर १२ वाजताच्या बैठकीला बोलावलेल्या मंडळांनी बैठकीवर बहिष्कार घातला. पदाधिकारी निघून जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस पदाधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र चिडलेल्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तालयातून काढता पाय घेतला.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलीस अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. नाराज मंडळांच्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न पोलीस अधिकारी करू लागले. मात्र, या मंडळांनी पोलिसांचा निषेध नोंदवत बैठकीला न थांबता पोलीस मुख्यालयाच्या आवारातून निघून गेले. काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचे फेसबुक लाईव्ह देखील केले.
हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर म्हणाले, गल्लीतील मंडळ असो व मानाचे किंवा प्रमुख मंडळ, या सर्वांची नियोजनाची एकत्रित बैठक आतापर्यंत आयोजित केली जात होती. यंदा मात्र त्या परंपरेत खंड पडला. मानाच्या व महत्त्वाच्या गणपती मंडळांप्रमाणेच शहरातील अनेक मंडळांची गणेशोत्सवाची परंपरा आहे. वेगळी बैठक घेण्याचे कारण काय आहे हे पोलिसांनी स्पष्ट करावे. आवाजाची मर्यादा, विसर्जन मिरवणुकीतील नियोजन या सर्वांसाठी आमचे प्रशासनाला सहकार्य असते. त्यामुळे मंडळांमध्ये दुजाभाव करणे योग्य नाही.
नुकतेच पकडण्यात आलेले दहशतवादी आणि आगामी गणेशोत्सव मंडळ याबाबत अनौपचारिक चर्चा करण्यासाठी काही मंडळांना पोलीस आयुक्तालयात बोलावण्यात आले होते. त्यात कोणताही औपचारिक निर्णय झाला नाही. आम्ही भेटून गेल्यानंतर दुसरी बैठक आयोजित करण्यात आली होती, याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया मानाच्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली आहे.
सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, बैठकीला थोडा उशीर झाल्याने व इतर मंडळांना वगळून बैठक बोलावली, असा गैरसमज झाल्याने काही गणेश मंडळांनी नाराजी व्यक्त केली. मात्र वस्तुस्थिती सर्वांना समजावून सांगण्यात आली. याबाबत पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.