बलात्काराची तक्रार थेट राष्ट्रीय आयोगाकडे
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
हिंजवडीतील आयटीपार्कमध्ये काम करणाऱ्या तरुणीने आपल्यावर झालेल्या बलात्काराची तक्रार थेट राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे. यापूर्वी हिंजवडीतील एका तरुणीने तिचा ऑनलाईन पाठलाग होत असल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे केली होती. ही दोन्ही प्रकरणे आयोगाने राज्य पोलिसांमार्फत हिंजवडी पोलिसांकडे पाठविली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्याचे नाव सिद्धार्थ त्रिपाणी (वय ३८, रा. मध्य प्रदेश) असे आहे. ३८ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली असून तिची आणि त्रिपाणीची पूर्वीपासून ओळख होती. या ओळखीतून त्यांच्यातील सहवास वाढत गेला. त्रिपाणीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. वाढलेल्या संबंधाचा गैरफायदा घेत त्रिपाणीने हिंजवडीतील एका सोसायटीत तसेच काळेवाडी येथील एका ठिकाणी पीडितेवर बलात्कार केला. यातून पीडिता गर्भवती राहिल्यावर त्रिपाणीने तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले. त्याचबरोबर त्रिपाणीने पीडितेकडून सहा लाख रुपये घेऊन ते परत करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे तर पीडितेबरोबर लग्नदेखील केले नाही.
पीडितेने त्रिपाणीकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच पैसेही परत देण्यास टाळाटाळ केल्यावर पीडितेने या प्रकरणी थेट राष्ट्रीय महिला आयोगाकडे अर्जाद्वारे तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्र पोलिसांमार्फत हिंजवडी पोलिसांकडे पाठविण्यात आले. त्यानंतर संबंधित पीडितेला बोलावून घेऊन तिचे म्हणणे ऐकून घेतल्यावर त्रिपाणी याच्यावर गुन्हा दाखल केला.
ऑनलाईन पाठलाग तक्रारही आयोगाकडे
यापूर्वी एका पीडितेचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे पाठलाग केला गेला होता. त्यामुळे संबंधित पीडितेने आरोपीला सोशल मीडियावर ब्लॉक केले होते. मात्र, त्याच्यापुढे जाऊन आरोपीने ‘पीडितेचा गुगल पे’ द्वारे पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यामुळे त्रासलेल्या पीडितेने या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. लग्नाच्या आमिषाने बलात्कार, गर्भपात आणि लाखोंची रोकड घेऊन ती परत न करणे आणि जी-पे पाठलाग या दोन्ही घटना उच्चभ्रू हिंजवडी परिसरात घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये पीडितांनी पोलिसांकडे न जाता थेट आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी पीडितांना बोलावून घेऊन गुन्हा दाखल करत आरोपींची धरपकड केली आहे. फौजदार छाया बोरकर तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.