डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे जिल्ह्यातील भोर आणि मुळशी तालुक्यातील काही गावांना पावसाळ्यात भूस्कलन होत आहे. त्यामुळे जीवितहानी आणि आर्थिकहानी मागील काही वर्षांपासून होत आहे. यात भोर तालुक्यात कोंढरी, धानवली तर मुळशी तालुक्यातील घुटके तसेच भोरमधील इतर गावांना देखील याचा मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे सरकारने यागावांचे पावसाळ्यापूर्वी पुनर्वसन करावे अशी मागणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले की, भोर तालुक्यातील कोंढरी, धानवली तर मुळशी तालुक्यातील घुटके गावचे पावसाळ्याच्या आत पुनर्वसन तातडीने करावे. तसेच भूस्खलन होणाऱ्या गावाना मदत करण्यासाठी शासनाने टास्क फोर्स तयार करण्यात यावा. ज्या गावांना भूस्खलन व अतिवृष्टीची भीती आहे, अशा गावातील शाळांची मजबुतीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात याव्यात.
पुढे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, भोर-महाड रस्त्यावर ४५ घरांचे ३५६ लोकसंख्या असलेले कोंढरी गावातील डोंगरात २०१९ साली भूस्कलन होऊन डोंगर खाली आले होते. या गावांना ज्यावेळी भूस्खलन झाले होते. त्याठिकाणी ३ ऑगस्ट २०२१ रोजी भेट दिली होती. या ठिकाणच्या अनेक भागात जमिनीला मोठ्या भेगा पडाल्याने गावात भीतीचे वातावरण झाले होते. गावातील ग्रामस्थांचे त्यावेळी जिल्हा परिषद शाळेत व इतर ठिकाणी गावाबाहेर तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. परंतु शाळेत देखील कंबरे इतके पाणी आले होते. तसेच याठिकाणच्या लोकांची परिस्थिती देखील अतिशय वाईट आहे.
भोर महसूल प्रशासनाने कोंढरी येथील खासगी गायरान २.८२ आर जागेत ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर क्रीडांगण, दवाखाना, बाग, रस्त्यासाठी जागा या कामांसाठी सुमारे १३ कोटी ८ लाख व जागेसाठी ४८ लाख ७५ हजार असा एकूण १३ कोटी ५७ लाख खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. याबाबत तत्कालीन पालकमंत्र्यांनी सन २०२१ मध्ये बैठक घेऊन निर्देश दिले आहेत. मात्र तरी देखील कार्यवाही झाले नसल्याचे समोर येत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.