वढूच्या १०० कोटींच्या जमिनीबाबत वक्फ बोर्डाची याचिका दाखल
# पुणे
वढू बुद्रुक येथील जमिनीबाबत अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
याबाबत 'महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड प्रोटेक्शन टास्क फोर्स' ने तक्रार केली होती. यावर न्यायालयाने पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तांना याबाबत खुलासा करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. या मुदतीत खुलासा न दिल्यास फौजदारी कारवाई करण्याची सूचनाही या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. एकूण १९ एकर जमीन असून बाजारभावानुसार तिची किंमत १०० कोटींच्या घरात आहे.
वाद सुरू असलेली ही जमीन देवस्थान इनाम जमीन आहे. त्याची १८६२ ची सनद आहे. ही जमीन वर्ग २, ३ मध्ये आहे. २०१६ मध्ये सातबारावर तशी नोंद आहे. त्यानंतर ४ एप्रिल २०१६ च्या 'जीआर'नुसार तहसीलदारांनी सातबारावर संस्थेच्या नावाची नोंद केली. त्यावर प्रांताकडे अपील केले गेले. त्यांनी वक्फ बोर्डाची मागणी मान्य केली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनीदेखील वक्फ बोर्डाच्या बाजूचा निर्णय कायम ठेवला. मात्र विभागीय आयुक्तांनी इनाम जमिनीवर खासगी लोकांची नावे चढवण्याचा निर्णय दिला आहे, अशी माहिती महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड टास्क फोर्सचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई मुल्ला यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली. या विरोधात महाराष्ट्र वक्फ टास्क फोर्सने कलम ५२/अ वक्फ कायदा १९९५ अन्वये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मो. बा. ताशीलदार तसेच वक्फ मंडळाचे चेअरमन डॉ. वजाहत मिर्झा यांच्याकडे याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
feedback@civicmirror.in