पुनर्विकास ठरला स्वप्नातील इमला
राजानंद मोरे
मागील अनेक वर्षांपासून पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची नुसतीच चर्चा सुरू आहे. पुण्याच्या रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार, अशा आशयाचे वृत्त आजवर अनेक वेळा प्रसारित करण्यात आले आहे. याशिवाय रेल्वे अर्थसंकल्पात पुणे स्थानक जागतिक दर्जाचे करण्याच्या घोषणा करण्यात आल्या. पण सध्य परिस्थितीत स्थानकात काहीच बदल झालेला नाही. पुनर्विकासाची चर्चा अजून प्राथमिक स्तरावरच असून सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या प्रस्तावित इमारतीचा आराखडाही अंतिम झालेला नाही. पुणे रेल्वेकडून अद्याप याबाबतचा कोणताही अधिकृत प्रस्ताव दिला गेला नसल्याचे अधिकाऱ्यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांना पुणे विमानतळाप्रमाणे नव्या रेल्वे स्थानकाची वाट पाहावी लागणार आहे.
पुणे हे देशातील प्रमुख महानगरांपैकी एक शहर आहे. औद्योगिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या विकसित असलेल्या देशातील मोजक्या शहरांमध्ये पुणे वरच्या क्रमांकावर आहे, पण अजूनही स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही. सध्याच्या विमानतळावर जागेअभावी प्रवाशांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना पायाभूत सुविधाही मिळत नाहीत. विमानतळासह रेल्वे स्थानक नव्याने उभारण्याची अनेक वर्षांपासून केवळ चर्चाच सुरू असून त्यात काहीच बदल झालेला नाही. दोन दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानकाच्या नव्या इमारतीचा आराखडा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
अत्यंत देखणी, सर्व सुविधांयुक्त इमारत असल्याचा दावा केला जात आहे. रेल्वे स्थानकासह ताडीवाला रस्त्याकडील बाजूला भली मोठी इमारत बांधून ती एकमेकांना जोडण्याचे नियोजन असल्याचे दिसते. मेट्रो, बस आणि रेल्वे अशा एकात्मिक वाहतूक व्यवस्थेला अनुसरून या इमारतीची रचना करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. पण प्रत्यक्षात हा आराखडा अजूनही अंतिम झालेला नाही. पुणे विभागातच ही पुनर्विकासाची चर्चा सुरू आहे. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना या आराखड्याचे नुकतेच सादरीकरण झालेले असले तरी यापूर्वीही असे सादरीकरण झाले आहे. प्रत्येक वेळी सादरीकरण केले जाते. त्यामध्ये इमारतीचा आराखडा, रचना, बदलत असतात, असे स्वत: मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनी स्पष्ट केले.
‘सीविक मिरर’ला रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, स्थानकाच्या पुनर्विकासाची चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे काम रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाकडे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरून काहीच होत नाही. स्थानकाच्या पुनर्विकासात अनेक मुद्दे आहेत. पुणे मेट्रोचे स्थानक याच परिसरात आहे. त्याचा विचार करावा लागणार आहे. स्थानक उभारताना प्रवाशांनाही अडचणी येऊ नयेत म्हणून पर्यायी व्यवस्था करावी लागेल. टप्प्याटप्याने हे काम करायचे म्हटले तरी जागेअभावी आताच अडचणी येतात. फलाटांची लांबी वाढवण्यासाठी विविध बाबींचा विचार करावा लागत आहे. आता संपूर्ण स्थानकाचा कायापालट करायचा असेल तर त्यासाठी खूप मोठे नियोजन लागेल. त्यासाठी मोठा कालावधी लागेल. अजूनही त्याबाबत काहीच चर्चा झालेली नाही.
कोणताही प्रकल्प उभारायचा असेल तर त्याचा सर्व बाजूने सखोल विचार करावा लागतो. त्यानुसार सध्या हा प्रकल्प चर्चेच्या पातळीवर आहे. अजूनही काही अंतिम झालेले नाही. त्यामुळे सध्या व्हायरल होत असलेल्या आराखड्याला काहीच अर्थ नाही. त्यात अनेक बदलही होऊ शकतात. नवा आराखडा तयार केला जाऊ शकतो. विविध आर्किटेक्टकडून असे आराखडे तयार करून घेतले जातात. त्याचे विविध टप्प्यांवर सादरीकरण होते. त्याची मंजुरी, बजेट अशा अनेक महत्त्वाच्या बाबी आहेत. हे काम सातत्याने सुरू असते. त्यामुळे सध्यातरी काहीही अंतिम झालेले नाही. सध्या आमचे पूर्ण लक्ष फलाटांची लांबी वाढविण्याच्या प्रकल्पाकडे आहे. त्याचे नियोजन सुरू आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.