लाल दिव्यांनी दिला उड्डाणपुलाला रेड सिग्नल
विजय चव्हाण
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित मेट्रो मार्गात व्यत्यय आल्याने 'आचार्य आनंदऋषीजी चौकातील ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेशद्वार) दुमजली उड्डाणपूल पाडण्यात आला. मात्र, दोन वर्षे उलटूनही उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू होऊ शकले नसल्याचं चित्र आहे.
याला नेमका विलंब कशामुळे होत आहे याचा शोध घेतला असता यामागे वेगळेच कारण असल्याची बाब नव्याने समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, इतर केंद्रीय मंत्री आणि इतर 'व्हीआयपी' यांचे अनेक दौरे झाले. या दौऱ्यांदरम्यान गणेशखिंड रस्त्याचा वापर वारंवार होत असल्याने येथील काम बंद ठेवण्याच्या सूचना वाहतूक पोलीस आणि प्रशासनाकडून मेट्रोचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना वारंवार देण्यात आल्या. याच रस्त्यावर राजभवन तसेच विविध केंद्रे तसेच राज्य सरकारची महत्त्वाची कार्यालये असल्याने सततच्या 'व्हीआयपी' दौऱ्यांमुळे काम पुढे सरकत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचा निर्धारित कालावधी नोव्हेंबर २०२४ आहे.
या व्हीआयपींच्या दौऱ्याआधी पालखी, जी- २० परिषद आणि इतर महत्त्वाच्या सणासुदीला काम बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे चार दिवस काम केल्यानंतर अशा दौऱ्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे पुन्हा काम बंद ठेवावे लागत असल्याने एकसलग काम करता येत नसल्याची खंत मांडण्यात आली. राजकीय अस्थिरता आणि सरकार दोनदा-तीनदा बनल्याने पुणे राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिले आहे.
या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कबुली दिली होती. मंगळवारी झालेल्या बैठकीत व्हीआयपी हे चौकातून क्षणार्धात जातात; पण सर्वसामान्यांची गैरसोय होते, ही वस्तुस्थिती पवार यांनी मान्य केली.
नागरिकांची गैरसोय दूर होण्यासाठी येथील काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करा, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचा निर्धारित कालावधी नोव्हेंबर २०२४ आहे. मात्र, तत्पूर्वीच हा पूल पूर्ण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याचा आराखडा पुढील बैठकीत सादर करावा, अशा सूचना पवार यांनी प्राधिकरणाला केल्या.
पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुंदीकरण, पदपथाची रुंदी कमी करणे, रस्ता क्रॉसिंग हटवणे, पर्यायी रस्त्यांची तरतूद करणे यांचा समावेश आहे. मात्र यातील काही कामे पालिकेशी संबंधित नाहीत. अशा स्थितीत उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. विद्यापीठ चौकात वाहतूक सुधारणा योजना राबविण्यात येणार आहे. हे पाहता मेट्रो मार्गासह उड्डाणपूल, भुयारी मार्ग, ग्रेड सेपरेटर बांधण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे ४२६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.