'प्री-वेडिंग ट्रीप'मध्ये बलात्कार, मग वराचा लग्नास नकार
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
लग्न ठरलेले असताना लग्नाआधी फिरायला गेलेल्या नियोजित वराने वधूवर बलात्कार करून नंतर लग्नास नकार दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लग्न न करता, सोन्या-चांदीचे दागिने, कपडे इत्यादी खर्च करायला लावून लग्नास नकार दिल्याप्रकरणी उच्चशिक्षित कुटुंबावर आणि वधूवर बलात्कार केल्याने दुबईत नोकरीस असलेल्या नियोजित वरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते दोघे लग्नाआधीच फिरण्यासाठी कर्जत येथे गेले.
देवदत्त वसंत भारदे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नियोजित वराचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या डॉक्टर आई-वडिलांवर, बहिणीचा पती आणि अन्य एका महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आळंदीत राहणाऱ्या २३ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने फिर्याद दिली आहे.
वधू-वरसूचक मंडळाद्वारे दोन्ही कुटुंबांनी लग्न ठरविले होते. त्यानंतर साखरपुडा झाल्यावर काही दिवसांसाठी देवदत्त नोकरीसाठी पुन्हा दुबईत गेला. सहा-सात महिन्यांनी तो परत आल्यावर पीडित तरुणी आणि देवदत्त फिरण्यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात असलेल्या एका रिसॉर्टवर गेले होते. त्या वेळी देवदत्तने मद्यप्रशान करून नियोजित वधूवर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघे घरी परतले. त्यानंतर किरकोळ कारणांवरून देवदत्त आणि त्याच्या कुटुंबीयांनी वाद घालण्यास सुरूवात केली, तसेच 'आता आम्हाला लग्नच करायचे नाही', असे म्हणून देवदत्त आणि त्याच्या कुटुंबीयांनी भांडण्यास सुरुवात केल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ठरलेल्या लग्नासाठी मंगल कार्यालय निश्चित करण्यात आले होते. निमंत्रण पत्रिकांचे वाटप करून, लग्नासाठी सोन्या-चांदीचे दागिने, कपडे आदींची खरेदी झाली होती. परंतु, देवदत्त आणि त्याचे कुटुंबीय लग्नास तयार नव्हते. अवघ्या २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून, दाग-दागिने घेतल्यानंतर आता लग्नास नकार देणाऱ्या उच्चशिक्षित कुटुंबीयांची पीडितेच्या घरच्यांनी आणि इतरांनीही बरीच समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरीही लग्नास नकार देणाऱ्या कुटुंबावर अखेर फसवणुकीचा आणि देवदत्तवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.