अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी नातेवाईकाला कारावास
रोहित आठवले
rohit.athavale@civicmirror.in
TWEET@RohitA_mirror
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नातेवाईकाला पुणे सत्र न्यायालयाने २० वर्षांच्या कारावासाची आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. २०१६ मध्ये पिंपरी पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या एका वसाहतीत हा प्रकार घडला होता. मुलीने एका बाळाला जन्म दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. बाळ, पीडित मुलगी आणि आरोपी यांच्या डीएनए टेस्टनंतर आरोपीची ओळख निश्चित झाली होती.
विक्रम राकेश लांबा (वय ३८, रा. दौंड) असे कारावासाची शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सत्र न्यायाधीश के. पी. नांदेकर यांनी हा निकाल दिला. जानेवारी ते डिसेंबर २०१६ या दरम्यान पिंपरीतील अल्पवयीन मुलीच्या घरी ही घटना घडली आहे. या प्रकरणी १५ वर्षीय मुलीच्या वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी हा पीडितेचा दूरचा नातेवाईक आहे. या आदेशानुसार ५० हजार रुपये दंडाची रक्कम पीडित मुलीला द्यावी. तसेच, ही रक्कम न भरल्यास आरोपीला एक वर्षाचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे निकालात नमूद करण्यात आले आहे.
लांबा हा काही कामानिमित्त मुलीच्या घरी राहायचा. घरात असताना त्याने दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अनेकदा बलात्कार केला. परंतु, मुलीची आई अपंग असल्याने मुलीने ही घटना घरी सांगितली नव्हती. २१ डिसेंबर २०१६ रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने हा गुन्हा उघडकीस आला. तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला पोटदुखीच्या गोळ्या दिल्या. मात्र, गोळ्या घेतल्यानंतरही तिला त्रास होत होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० च्या सुमारास तिने मुलाला जन्म दिला.
मुलीला सुरुवातीला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे प्राथमिक उपचारानंतर तिला पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. वायसीएम रुग्णालयाने याबाबत पोलिसांना कळविले होते. तसेच, पीडितेने रुग्णालयात असताना कुटुंबीयांना याची माहिती दिली होती. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. परंतु, मुलीने सांगितलेले आरोपीचे नाव आणि लांबा या दोघांच्या नावात थोडा बदल होता. तसचे, मुलगी कालांतराने तिचा जबाब बदलत असल्याचे तपास अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली कुलथे यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे याबाबत अतिरिक्त चौकशी सुरू असताना लांबा नामक एक व्यक्ती आमचा दूरचा नातेवाईक असल्याची माहिती पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना दिली होती.
याच आधारे पोलिसांनी दौंड येथे जाऊन लांबा, जन्माला आलेले बाळ आणि पीडिता यांची डीएनए टेस्ट केली असता लांबा हाच आरोपी असल्याचे उघड झाले. त्यामुळे साहाय्यक निरीक्षक रूपाली कुलथे, रत्नमाला सावंत यांनी लांबाला अटक केली होती.
न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांवरून मुलीचे वय १६ वर्षांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले असून, आरोपी जन्मलेल्या बाळाचा बाप असल्याचे वैद्यकीय पुरावेही आहेत. युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हा निकाल दिला. गुन्हा सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे ठरले, असे निरीक्षण या खटल्याच्या सुनावणी वेळी न्यायालयाने नोंदविले.
साहाय्यक जिल्हा सरकारी वकील मारुती वाडेकर, सरकारी वकील संध्या काळे, अरुंधती ब्रम्हे आदींनी सरकार पक्षातर्फे या खटल्यात बाजू मांडली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.