चिखलीत ‘रंगली’ कर्नाटकमधील ग्रामपंचायत निवडणूक

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा जणांनी चिखली येथून सात जणांचे अपहरण केले. यामध्ये पाच ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Mon, 7 Aug 2023
  • 11:18 am
चिखलीत ‘रंगली’ कर्नाटकमधील ग्रामपंचायत निवडणूक

चिखलीत ‘रंगली’ कर्नाटकमधील ग्रामपंचायत निवडणूक

सात जणांचे अपहरण, काहींची सुटका

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा जणांनी चिखली येथून सात जणांचे अपहरण केले. यामध्ये पाच ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.

चिखलीतील सहयोगनगर येथे शुक्रवारी (दि. ४) रात्री ही घटना घडली. यावेळी अपहरणकर्त्यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि मोबाइल आधीच आपल्या ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवून घेऊन गेले. अपहरण झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांपैकी एक वीरसिंग सेऊ पवार (वय ३५, रा. भोगालिंगदल्ली, पो. आयनोल्ली, ता. चिंचोळी, जि. कलबुर्गी, कर्नाटक) यांनी नंतर कशीबशी आपली सुटका करवून घेतली आणि नंतर चिखली पोलीस ठाण्यात या प्रकरणाची फिर्याद दिली. त्यानुसार लोकेश बाबुराव फत्तेपूरकर आणि विजयकुमार माडगे (दोघेही रा. आयनोल्ली, ता. चिंचोळी, जि. कलबुर्गी, कर्नाटक) तसेच त्यांचे आठ साथीदार (नाव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून आयनोल्ली या गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी पक्षाला बहुमत मिळून सरपंचपद त्यांच्या गटाला मिळावे, या उद्देशाने हे अपहरण केले. फिर्यादी हे चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहयोगनगर येथील असलेल्या कृष्ण लॉज येथे मुक्कामास होते. शुक्रवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास त्यांच्या गावाकडील ओळखीचे आरोपी फतेपूरकर आणि माडगे हे इतर साथीदारांसोबत तेथे आले. त्यांनी फिर्यादी आणि इतर चार ग्रामपंचायत सदस्यांसह सात जणांचे चार वाहनांमधून अपहरण केले. फिर्यादी यांच्या खिशातून १९ हजार रुपये आणि मोबाइल तसेच साक्षीदार शेख बक्‍तीयार जागीरदार यांच्याकडील मोबाईल आणि साडेआठ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.  कलबुर्गी भागातील एका ग्रामपंचायतीचे सदस्य पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन का थांबले होते, याबाबत मात्र चिखली भागात चर्चा सुरू आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कलबुर्गी पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती कळविली आहे. त्यानुसार दोन्ही पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story