यार्ड रिमॉडेलिंगमुळे रेल्वे स्थानक बंद?

पुणे रेल्वे स्थानकातील यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाबाबत अजूनही अधिकाऱ्यांमध्येच मोठा संभ्रम असल्याचे दिसते. यापूर्वी रेल्वेकडून या कामासाठी २८८ दिवसांचे नियोजन केले जात होते. आता हा कालावधी १०७ दिवसांपर्यंत कमी करण्यात आल्याचे समजते. इतक्या कमी कालावधीत काम करायचे असेल तर पुणे स्थानक किमान तीन-चार दिवस पूर्णपणे बंद ठेवावे लागणार आहे. तसेच स्थानक पूर्णपणे बंद न ठेवता अनेक रेल्वे गाड्या इतर स्थानकांतून सोडण्याचे नियोजनही केले जाऊ शकते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 25 Mar 2023
  • 01:59 pm
यार्ड रिमॉडेलिंगमुळे रेल्वे स्थानक बंद?

यार्ड रिमॉडेलिंगमुळे रेल्वे स्थानक बंद?

रेल्वे अधिकाऱ्यांत २८८ की १०७ िदवसांवरून संभ्रम; अनेक रेल्वे अन्य स्थानकांतून सोडणार

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

पुणे रेल्वे स्थानकातील यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाबाबत अजूनही अधिकाऱ्यांमध्येच मोठा संभ्रम असल्याचे दिसते. यापूर्वी रेल्वेकडून या कामासाठी २८८ दिवसांचे नियोजन केले जात होते. आता हा कालावधी १०७ दिवसांपर्यंत कमी करण्यात आल्याचे समजते. इतक्या कमी कालावधीत काम करायचे असेल तर पुणे स्थानक किमान तीन-चार दिवस पूर्णपणे बंद ठेवावे लागणार आहे. तसेच स्थानक पूर्णपणे बंद न ठेवता अनेक रेल्वे गाड्या इतर स्थानकांतून सोडण्याचे नियोजनही केले जाऊ शकते. हे काम कधी सुरू होणार याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. कमी कालावधीत काम करण्याचे निश्चित झाले तर आठवड्यातून काही दिवस रेल्वे स्थानक बंद ठेवावे लागले तर त्याचा त्रास प्रवाशांनाच होणार आहे.

पुणे रेल्वे स्थानकातील फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. आतापर्यंत जवळपास ५५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. या स्थानकाला जागतिक दर्जाचे स्थानक बनविण्याच्या घोषणा अनेकदा करण्यात आल्या. पण त्या प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. यार्ड रिमॉडलिंगही त्याचाच एक भाग आहे. पुणे रेल्वे स्थानक हे मोठे जंक्शन असूनही फलाटांच्या लांबीअभावी अनेक गाड्यांना फलाटावर येण्यासाठी वाट पाहावी लागते. दररोज २५० हून अधिक गाड्यांमधून जवळपास दीड लाख प्रवाशांची ये-जा होते. अनेक गाड्या २४ व २६ डब्ब्यांच्याही आहेत. परंतु, फलाटांची लांबी कमी असल्याने २४ किंवा त्यापेक्षा जास्त डब्यांच्या गाड्या थांबविणे शक्य होत नाही.

मागील काही महिन्यांपासून पुणे विभागाकडून या कामासाठी रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला या कामासाठी २८८ दिवस निश्चित केल्याचे सांगितले जात होते. विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांनीही याबाबत हेच सांगितले होते. या कामासाठी काही गाड्या शिवाजीनगर तर काही गाड्या हडपसर स्थानकातून सोडण्याचे नियोजन केले जात आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या इतर मार्गावरून वळविण्यात येणार आहेत. असे असले तरी स्थानक बंद ठेवणार नसल्याचे सुरुवातीला स्पष्ट करण्यात आले होते. आता रेल्वेकडून पुन्हा या नियोजनात बदल केल्याचे सांगितले जात आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २८८ दिवसांचे नियोजन केले होते. पण हा कालावधी खूप मोठा आहे. प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे हा कालावधी १०७ दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसला तरी एवढे दिवस काम चालू शकते. असे करायचे झाल्यास पुणे रेल्वे स्थानकातील गाड्यांचे संचलन दोन-तीन दिवसांसाठी पूर्णपणे बंद करून काम करावे लागणार आहे. काही गाड्या पूर्णपणे बंद ठेवाव्या लागतील. काही गाड्या वळवाव्या लागतील. काही गाड्या शिवाजीनगर किंवा हडपसर स्थानकातून सोडल्या जातील, पण त्यातही मोठी अडचण आहे. पुणे विभागाच्या गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. असे झाल्यास त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसेल. त्यामुळे या सर्व बाबींचा प्राधान्याने विचार करावा लागणार आहे.

यार्ड रिमॉडलिंगचे काम नेमके सुरू कधी करायचे, याबाबत संभ्रम आहे. एप्रिल महिन्यात काम सुरू केल्यास जुलै महिन्यापर्यंत काम सुरू राहील. या काळात पावसाचा अडथळा येऊ शकतो. तसेच उन्हाळी सुट्ट्या, शाळा-महाविद्यालये सुरू होण्याचा कालावधीही हाच आहे. पावसाळ्यानंतर काम करायचे झाल्यास दिवाळी व इतर सणांमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळे नेमका कालावधी निश्चित करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. त्यानंतरच त्याबाबत अधिकृतपणे घोषणा केली जाईल, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

पुणे रेल्वे स्थानकात सहा फलाट आहेत. त्यापैकी केवळ एक व तीन क्रमांकाच्या फलाटावरच २४ डब्यांच्या गाड्या थांबण्याची क्षमता आहे. त्यामुळे इतर दोन, चार, पाच, सहा क्रमांकाच्या फलाटांवर या गाड्या थांबविता येत नाहीत. त्यासाठी फलाट एक व तीनवर गाड्या आणाव्या लागतात. हे फलाट रिकामे नसल्यास या गाड्या लांबवर थांबवाव्या लागतात किंवा या गाड्यांसाठी इतर गाड्यांना थांबवून ठेवण्यात येते. फलाटांची लांबी मुंबई दिशेकडील बाजूने वाढविली जाणार आहे. त्यासाठी रेल्वेमार्गांची रचनाही बदलावी लागेल. ही कामे टप्प्याटप्प्याने केली जाणार आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story