विमानतळ रस्ता
राजानंद मोरे/ तन्मय ठोंबरे
rajanand.more@civicmirror.in
TWEET@Rajanandmirror
जी-२० शिखर परिषदेसाठी पुण्यात येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुणे विमानतळापासूनच रेड कार्पेट टाकले जात आहे. पुण्यात नागरिकांना सर्व पायाभूत सुविधा पुरविल्या जातात आणि त्या सुविधा कायमस्वरूपी मिळत असल्याचे दिसावे यासाठी जोरदार सुशोभीकरण सुरू आहे. पण हे करत असतानाच या कार्पेटलाही भोके म्हणजे उणिवा असल्याचे ‘सीविक मिरर’च्या पाहणीत समोर आले आहे.
याचा संबंध थेट रोज रस्त्यावर उतरून धावपळ करणाऱ्या पुणेकरांशी असला तरी पालिका प्रशासनाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. रस्त्यांची अर्धवट करण्यात आलेली डागडूजी, बसथांब्यांअभावी उघड्यावर उभे राहणारे प्रवासी, पदपथांची दुरवस्था, डांबरीकरणाने तयार झालेले कृत्रिम खड़्डे, गतिरोधक नसल्याने रस्ता पार करण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांना करावी लागणारी कसरत अशा अनेक उणिवा आढळून आल्या आहेत. परिषदेसाठी आता तीनच दिवस उरले असून महापालिकेकडून उरलेली कामे उरकण्यासाठी घाई केली जात आहे. त्यामुळे या तीन दिवसांत तरी या उणिवा दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बसथांबे गायब, प्रवासी उघड्यावर
पुणे विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावर दोन्ही बाजूला पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसथांब्यांवरही जी-२० चे स्टीकर्स लावण्यात आले आहेत. पण या मार्गावर सात-आठ ठिकाणी बसथांब्यांसाठी शेडच नाही. विशेष म्हणजे तिथे बसथांब्याच्या पाट्याही नाहीत. त्यामुळे या बेवारस थांब्यांवर प्रवाशांना उघड्यावर थांबून बसची वाट पाहत उभे राहावे लागत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळ, रुबी हॉल क्लिनिक, येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा, संजय पार्क, पुणे विमानतळ आदी ठिकाणी अशीच स्थिती आढळून आली. तसेच काही ठिकाणी बस थांबे असून प्रवाशांना अडचणीचे ठरत आहेत. ५०९ चौकाजवळचा बसथांबा आधी रस्त्याच्या बाजूला होता. पण आता तो नर्सरीजवळ आतल्या बाजूस उभारण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा प्रवाशांना काहीच उपयोग होत नाही. बीआरटी मार्ग बंद असून त्यातील थांब्यांचीही दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी बसथांब्याच्या ठिकाणचा पदपथ सुस्थितीत नसल्याने प्रवाशांना तिथे ये-जा करणे शक्य होत नाही.
रस्त्यात कृत्रिम खड्डे
पालिकेने सेनापती बापट रस्त्यावर ठिकठिकाणी डांबरीकरण केले आहे. पण या डांबरीकरणामुळे रस्त्यात कृत्रिम खड्डे तयार झाले आहेत. पावसाळी नाल्यांची झाकणे रस्त्याखाली गेल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशी स्थिती अनेक ठिकाणी आढळून आली. त्यामुळे वाहनचालकांना सावधपणे वाहने चालवावी लागत आहेत.
पादचारी उपरे
पालिकेने पदपथांची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले असले तरी ठिकठिकामी पादचारी उपरेच असल्याचे दिसून आले. डांबरीकरण करण्यासाठी खरवडून काढण्यात आलेल्या पुर्वीच्या रस्त्याचा राडरोडा काही ठिकाणी पदपथावर दिसून आला. बंडगार्डन रस्त्यावर दोन्ही बाजूला पदपथाची दुरवस्था झाल्याचे दिसते. तसेच आरटीओ ते जहांगीर रुग्णालय दरम्यानच्या रस्त्यावर पदपथ अर्धवट अवस्थेत आहेत. येरवड्यातील गोल्फ क्लब चौकातील उड्डाणपुल काही दिवसांतच पूर्ण करण्यात आला आहे. पण त्याखालचा रस्ता तसेच पदपथाची डागडुजीही करण्यात आलेली नाही. सर्व परदेशी पाहुणे पुलावरूनच प्रवास करणार आहेत. त्यामुळे खालच्या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसते. काही ठिकाणी पदपथावरच वाहनांची पार्किंग असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे.
सायकल ट्रॅक बनला पार्किंग
महानगरपालिकेने सेनापती बापट रस्त्यावर डांबरीकरणानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाल रंगाचा पट्टा मारून सायकल ट्रॅक तयार केला आहे. पण या ट्रॅकवर दुचाकी, चारचाकी, रिक्षा तसेच इतर वाहने अनेक ठिकाणी थांबल्याचे दिसून आले. त्यामुळे हा ट्रॅक केवळ दिखाव्यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी हा ट्रॅकही अर्धवट स्थितीत असल्याचे आढळून आले. तर पावसाळी नाल्यांचे झाकणेही काही ठिकाणी या ट्रॅकच्या मध्येच आहेत.
गतिरोधकांचा अभाव
पुणे विमानतळापासून ५०९ चौकापर्यंत नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. तसेच हा रस्ता अरुंदही झाला आहे. पण कुठेही गतिरोधक नसल्याने वाहने वेगात जात असल्याचे आढळून आले. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. गतिरोधक नसल्याने अनेकदा वाहने वेगात पुढे जातात. बंडगार्डन पुल ओलांडल्यानंतर आरटीओपर्यंतच्या रस्त्यावर कुठेही गतिरोधक दिसून आला नाही. सेनापती बापट रस्त्यावरही अशीच स्थिती होती. त्यामुळे रस्ता ओलांडताना नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याचे दिसून आले.
अशीही लपवालपवी
पुणे विमानतळापासून सेनापती बापट रस्त्यापर्यंत महापालिकेने ठिकठिकाणी पडदे लावून रस्त्यांच्या कडेची दुरवस्था झाकली आहे. बंडगार्डन रस्त्यावर तर स्वच्छतागृहसुद्धा पडदे टाकून झाकण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना ते दिसतही नाही. मेट्रोचे काम अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहे. रस्ता दुभाजक तयार झालेले नाहीत. तिथेही लोखंडी बॅरिकेड्स लावून त्यावर जी-२० चे स्टीकर्स चिटकवण्यात आले आहे. पण त्यामागे राडारोड टाकण्यात आल्याचे दिसून आले. संपूर्ण रस्त्यावरील भिंतींवर रंगरंगोटी करण्यात आली आहे. दुभाजकही रंगवण्यात आले आहेत. पण ठिकठिकाणी पान-गुटखा खाणाऱ्यांनी त्यावर थुंकून रंग बदलून टाकला आहे. काही ठिकाणी कंपाऊंडच्या भिंती तुटल्या आहेत, त्यालाही रंगरंगोटी केली आहे.
झाडे सुकू लागली
साकोरेनगर ते पुणे विमानतळ रस्त्त्याच्या दुभाजकात महापालिकेने जुनी झाडे काढून नव्याने फुलझाडे लावून सुशोभीकरण केले आहे. पण पाण्याअभावी ही झाडे सुकू लागल्याचे आढळून आले. नव्याने लावलेल्या झाडांना पाणीच मिळत नसल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. महापालिकेने अशाच प्रकारे संपूर्ण रस्त्यांवर कुंड्यांमध्येही झाडे ठेवली आहे. काही ठिकाणी कायमस्वरुपी ही झाडे ठेवण्यात येणार आहेत. तर पदपथांवरील कुंड्या काढल्या जाणार आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.