चिखलीच्या इंद्रायणी पात्रात राडारोडा

नदीपात्रात भराव टाकून नैसर्गिक पाण्याचे स्रोत प्रदूषित होऊ नये यासाठी नदी किनाऱ्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने "रिव्हर मार्शल' नियुक्‍त केले आहेत. असे असले तरी पिंपरी-चिंचवडमध्ये नदीपात्रात भराव टाकल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. त्यातच वेगाने बांधकाम होणाऱ्या मोशी, चिखलीत पाण्याचे प्रदूषण होत असून चिखली परिसरात ठिकठिकाणी इंद्रायणी नदीपात्रात भराव टाकण्याचे काम सुरू आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 12 Mar 2023
  • 10:18 am
चिखलीच्या इंद्रायणी पात्रात राडारोडा

चिखलीच्या इंद्रायणी पात्रात राडारोडा

प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नेमलेले ‘रिव्हर मार्शल’ बिनकामाचे ठरल्याचा आरोप

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

नदीपात्रात भराव टाकून नैसर्गिक पाण्याचे स्रोत प्रदूषित होऊ नये यासाठी नदी किनाऱ्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने "रिव्हर मार्शल' नियुक्‍त केले आहेत. असे असले तरी पिंपरी-चिंचवडमध्ये नदीपात्रात भराव टाकल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. त्यातच वेगाने बांधकाम होणाऱ्या मोशी, चिखलीत पाण्याचे प्रदूषण होत असून चिखली परिसरात ठिकठिकाणी इंद्रायणी नदीपात्रात  भराव टाकण्याचे काम सुरू आहे. चिखलीगाव येथील स्मशान भूमीच्या बाजूलाच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकला आहे. या भरावाकडे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे मात्र लक्ष गेलेले दिसत नाही. यामुळे पालिकेने नेमलेले ‘रिव्हर मार्शल’ बिनकामाचे ठरल्याचा आरोप नागरिक करत आहेत.  

गुजरातची राजधानी अहमदाबादमधील साबरमती नदीच्या धर्तीवर पिंपरी- चिंचवड शहरातही नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा पाटबंधारे विभागाकडून शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या नदी सुधार प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील नदीच्या पात्रात आणि निळ्या पूर रेषेच्या आत मोठ्या प्रमाणात भर टाकून अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत.

नदीपात्रात राडारोडा टाकू नये आणि टाकल्यास तत्काळ कारवाई व्हावी यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने रिव्हर मार्शलची नियुक्‍ती केली आहे. परंतु, या रिव्हर मार्शलनाही चकवा देत ठिकठिकाणी नदीपात्रात भराव टाकण्याचे काम सुरू आहे. नदीपात्रालगत ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. मात्र या कामाचे ठेकेदार ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी खोदताना निघालेला राडारोडा नदीपात्रात टाकण्याचे काम राजरोस करत आहेत. याबाबत पर्यावरण विभागाला माहिती असूनही संबंधित अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.

चिखली येथील स्मशानभूमीच्या बाजूलाही मोठा चर खोदण्यात आला आहे. हे खोदकाम करताना निघालेला राडारोडा दुसऱ्या बाजूला न टाकता थेट नदीपात्रातच टाकण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेने नियुक्‍त केलेले रिव्हर मार्शल करतात तरी काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महापालिकेचेच अतिक्रमण

चिंचवडगावात नदीपात्रात महापालिकेनेच अतिक्रमण केले असल्याचे पत्र पाटबंधारे विभागाने दिले आहे. एवढेच नव्हे तर नदीपात्रात केलेले रस्त्याचे काम काढून घ्यावे, अशाही सूचना केल्या आहेत. त्यामुळे महापालिकाच नदीपात्रात अतिक्रमण करीत असेल तर कारवाई करणार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.

चिंचवडमध्येही नदीकिनारी अनधिकृत बांधकामे

चिंचवडगावात नदीकिनारी विकास आराखड्यातील १८ मीटर रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम जवळपास ७० टक्‍के पूर्ण झाले आहे. त्यामुळे या भागातील रहदारी वाढली आहे. ही संधी साधून अनेकांनी या भागात मोठ्या प्रमाणात पत्र्याची शेड उभारून ती भाड्याने दिली आहेत. या शेडमध्ये भाडेकरू असलेल्या गॅरेजवाल्यांनी त्यांच्याकडे आलेली भंगारातील वाहने रस्त्यावरच उभी केली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होऊनही महापालिकेने या बांधकामांना साधी नोटीसही दिलेली नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story