Zika Virus: एरंडवणे झिकाचा हॉटस्पॉट?

पुणे: एरंडवणे परिसरात झिकाचा संसर्ग झालेले पाच रुग्ण आढळून आल्यानंतर बुधवारी  (दि. १०) आणखी एका ३८ वर्षीय तरूणाला झिका संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे या परिसरात आता एकूण रुग्णांची संख्या सहावर गेली आहे.

Zika Virus, Pune, Pune News, Zika in Pune, Erandwane, Zika in Erandwane

संग्रहित छायाचित्र

पूर्वी पाच रुग्ण सापडल्यानंतर याच भागात आढळला झिकाचा आणखी एक रूग्ण, पुणे शहरातील रूग्णसंख्या पोहोचली १६ वर

पुणे: एरंडवणे परिसरात झिकाचा संसर्ग झालेले पाच रुग्ण आढळून आल्यानंतर बुधवारी  (दि. १०) आणखी एका ३८ वर्षीय तरूणाला झिका संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे या परिसरात आता एकूण रुग्णांची संख्या सहावर गेली आहे.

शहरातील एकूण रूग्णसंख्येपैकी सर्वाधिक रूग्णसंख्येची नोंद या परिसरात झाली आहे. त्यामुळे एरंडवणे हा भाग झिकाचा हॉटस्पॉट तर नाही, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. बुधवारी सापडलेल्या एरंडवणेतील या रूग्णामध्ये ताप, अंगावर लाल चट्टे यासारखी लक्षणे आढळून आली आहेत.

पुण्यात झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी एरंडवणे परिसरात झिकाचा एक रूग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता शहरातील एकूण झिका बाधित रूग्णांची संख्या १६ वर पोहचली आहे. यामध्ये महिला रूग्णांचे प्रमाण अधिक असून ११ महिलांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. यात आठ गर्भवतींचा समावेश आहे, तर पुरूष रूग्णांची संख्या केवळ पाच आहे.

शहरात आतापर्यंत आढळून आलेल्या रूग्णसंख्येमध्ये गर्भवती महिलांचे प्रमाण अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बावधन भागातील उजवी भुसारी कॉलनी परिसरात १५ वर्षीय तरूणाला झिका संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर पाषाण परिसरात १८ वर्षीय आणि १९ वर्षीय या दोन गर्भवतींनाही झिका झाल्याचे निदान झाले आहे. यातील १८ वर्षीय महिला ही २८ आठवड्यांची गर्भवती असून तीच्यामध्ये सांधेदुखी, डोकेदुखीची लक्षणे आढळून आली आहेत. तर १९ वर्षीय महिला ही २३ आठवड्यांची गर्भवती आहे. तिला घसा खवखवण्याची लक्षणे दिसून आली आहेत. सध्या या दोन्ही गर्भवतींची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. शहरात आतापर्यंत आढळून आलेल्या रूग्णसंख्येमध्ये गर्भवती महिलांचे प्रमाण वाढत असल्याने शहरातील गर्भवती महिलांची तपासणी करण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना
झिका विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी ज्या भागात झिकाचे रुग्ण आढळून येत आहेत, त्या भागात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहे. नागरिकांचे सर्वेक्षण आणि संशयितांची तपासणी करून त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी एनआव्हीकडे पाठवण्यात येत आहेत.
शहरात सुरूवातीला एरंडवणे परिसरात झिका विषाणूचे दोन रूग्ण आढळून आले होते. त्यानंतर शहराच्या विविध भागांमध्ये या विषाणूने शिरकाव केला आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रूग्णसंख्येत एरंडवणे परिसरातील ६, पाषाणमधील ३, मुंढव्यातील २, कोथरूडमधील २ आणि आंबेगाव बुद्रुक, खराडी, कळस परिसरातील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. रूग्ण आढळून आलेल्या परिसरातील १० जणांच्या रक्तांचे नमुने आरोग्य विभागाने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले आहेत. यात चार गर्भवतींचा समावेश आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest