Addiction : व्यसनाधीनतेकडे तरुणाईची पावले; किशोरवयीन मुला-मुलींमध्ये धूम्रपान, मद्यपानाची क्रेझ

सहज उपलब्ध होणारी दारू आणि सिगारेटमुळे (cigarettes) किशोरवयीन मुले, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात व्यसनाकडे वळत आहेत. शिक्षण आणि करिअरच्या टर्निंग पॉईंटवर अभ्यासाऐवजी मद्यपान आणि धूम्रपान (smoking) करण्यात वेळ वाया घालवत आहेत.

addiction

व्यसनाधीनतेकडे तरुणाईची पावले; किशोरवयीन मुला-मुलींमध्ये धूम्रपान, मद्यपानाची क्रेझ

प्रारंभी स्टेटस सिम्बॉल आणि मित्रांच्या आग्रहापोटी तरुणाईची वाटचाल व्यसनाधीनतेकडे

सहज उपलब्ध होणारी दारू आणि  सिगारेटमुळे (cigarettes) किशोरवयीन मुले, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात व्यसनाकडे वळत आहेत. शिक्षण आणि  करिअरच्या टर्निंग पॉईंटवर अभ्यासाऐवजी मद्यपान आणि धूम्रपान (smoking) करण्यात वेळ वाया घालवत आहेत.तरुणांमध्ये दारू पिण्याचे आणि सिगारेट ओढण्याचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत आहे.

मित्रांसोबतच्या पार्ट्या, उच्चभ्रू वसाहतींमधील पार्ट्यांमध्ये दारूची सहज देवाणघेवाण, बदलत्या जीवनशैलीमुळे सुरुवातीला स्टेटस सिम्बॉल आणि मित्रांचे आग्रह, दबाव यामुळे व्यसनाधिनतेकडे पावले पडत आहेत. दारूचा एक पेग किंवा  सिगारेटचा एक स्ट्रोक विद्यार्थ्यांना या वाटेवर घेऊन जातो. समुपदेशक आणि मानसशास्त्रज्ञांच्या मते पुण्यातील किशोरवयीन मुलांमध्ये दारू आणि तंबाखू सेवनाचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत आहे. शिक्षण संशोधक डॉ. श्रुती पानसे म्हणाल्या, कोणत्याही व्यसनांच्या आहारी जाण्याची कारणे हार्मोनल बदल, कुतूहल, समवयस्कांचा दबाव हे असते. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणारे धूम्रपान आणि मद्यपानाची क्रेझ असते. त्यामुळे ते ओढले जातात. कुटुंबातील कोणी व्यसनाधीन असेल, आई-वडीलांचे पटत नसेल तर  एकाकी झालेल्या मुलांनाही दारूचे व्यसन लागू शकते.  पालकांनी मुलांशी संवाद साधायला हवा. त्यांचे मित्र कोण आहेत, हे पाहायला हवे. केवळ वैयक्तिकच नाही तर समूह समुपदेशनाची आवश्यकता आहे. सामाजिक कार्यकर्ते आनंद रणधीर म्हणाले की, समाजात जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. जीवन धावपळीचे झाले आहे.  भावी पिढ्यांचे मानसिक स्वास्थ्य समृद्ध व्हावे, असे वाटत असेल तर आपण समुपदेशन आणि मुलांच्या मानसिक आरोग्याचे महत्त्व आधी समजून घेतले पाहिजे. पालकांनी  जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.  पालकांनी पूर्वक मुलांची भावनिक आणि मानसिक काळजी घेतली पाहिजे. त्यांचे मनोबल आणि मानसिक संतुलन ढळणार नाही हे पाहायला हवे. घरी असताना एकत्र चहा, एकत्र जेवताना त्यांचे मत विचारणे, त्यांना आदर देणे खूप महत्वाचे आहे.

समुपदेशक संगिता निंबाळकर म्हणाल्या की, बहुतेक वेळा विद्यार्थी दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींना भुलतात. कौटुंबिक वाद, संवादाचा अभाव, सहज मिळणारा पैसा, माध्यमांचा प्रभाव आणि सामाजिक प्रतिष्ठा हे घटक कोणत्याही प्रकारच्या व्यसनामागे आहेत. झटपट समाधान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यसनाची सवय लागते. शालेय स्तरावर आम्ही जनजागृतीसाठी कार्यशाळा,भाषणे आणि पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करतो.

मानसिक आरोग्य राखण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या...

आजच्या तणावपूर्ण जगात आणखी काही मुद्दे लक्षात ठेवायला हवेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. तणावापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने काही ना काही छंद जोपासला पाहिजे. त्यासाठी माणसाला त्याची आवड काय आहे हे कळायला हवे. वाचन, लेखन, पोहणे, चालणे, खेळणे, सायकल चालवणे, मित्रांसोबत गप्पा मारणे यापैकी कोणत्या ना कोणत्या छंदात गुंतले पाहिजे. त्यामुळे आपले मानसिक आरोग्य राखण्यास मदत होते.  प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान दहा मिनिटे ध्यान करावे.त्यामुळे मन सकारात्मक होते, असे आवाहन समुपदेशक करतात.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest