विद्यापीठामधील विद्यार्थ्यांनीच्या पोह्यांमध्ये अळी तर उपीट मध्ये केस!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलांच्या आणि मुलींच्या मेस मधील जेवणात अळी, झुरळे, प्लास्टीक, केस इत्यादी गोष्टी निघणे हे आता नवीन राहिले नाही. गेल्या वर्षभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत.
काल दिनांक ९ मार्च २०२४ रोजी सकाळी पुन्हा एकदा मुलींच्या मेसमध्ये एका विद्यार्थिनीच्या पोह्यांमध्ये अळी तर उपीट मध्ये केस दिसून आला आहे. वारंवार अशा घटना घडतात. सर्व विद्यार्थी संघटना याविरोधात आवाज उठवतात. संबंधित मेस चालक बदलला जातो. नवीन माणूस येतो. परंतु जेवणाचा दर्जा मात्र सुधारत नाही. आमची विद्यापीठ प्रशासनास नम्र विनंती आहे की त्यांनी आता यावर कायमस्वरूपीचा मार्ग काढावा. अन्यथा असे निकृष्ट दर्जाचे जेवण खाऊन विद्यार्थ्यांच्या जीवास काही धोका निर्माण झाला तर त्यास सर्वस्वी विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहिल असे विद्यापीठ भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समितीचे सदस्य राहुल ससाणे यांनी सांगितले.
या सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकांचा समावेश असलेली उपहारगृह व भोजनगृह दक्षता समिती तसेच विद्यार्थीचा समावेश असलेली भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती अशा दोन समित्या गठीत केल्या आहेत. या समितीमधील विद्यार्थी प्रतिनिधी अधूनमधून भोजनगृहास भेटी देतात. जेवणाचा दर्जा तपासतात परंतु प्राध्यापकामधून अध्यक्ष वगता इतर किती सदस्य मेसला भेटी देतात हा संशोधनाचा विषय आहे, अशी माहिती ससाणे यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.