यंदा जपून खा आंबा, नाही तपासणीचा थांबा

बाजारात कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यावर एरवी दरवर्षी अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) वॉच असतो. मात्र यंदा मनुष्यबळाअभावी तसेच निवडणुकीची ड्युटी लागल्याने आंब्यावर कारवाई तर लांबच, त्याची तपासणीसुद्धा केली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

संग्रहित छायाचित्र

बाजारातील आंबा तपासणीविनाच, यंदा लोकसभा निवडणुकीमुळे मनुष्यबळाअभावी अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई नाहीच

पंकज खोले 
बाजारात कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यावर एरवी दरवर्षी अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) वॉच असतो. मात्र यंदा मनुष्यबळाअभावी तसेच निवडणुकीची ड्युटी लागल्याने आंब्यावर कारवाई तर लांबच, त्याची तपासणीसुद्धा केली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. (FDA)

एफडीएच्या पुणे सहआयुक्त कार्यालयात यंदाच्या मोसमात आंब्यावर केलेल्या कारवाईची माहिती विचारली असता, अद्याप एकावरही कारवाई केली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बाजारात यंदाचा आंबा हा मोठ्या प्रमाणात तपासणी न करता तसेच कोणत्याही कारवाईला न जुमानता दाखल झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरवर्षी बाजारात आंबा (Mango Season) दाखल झाल्यापासून एफडीए अधिकारी व कर्मचारी यांची त्याच्यावर करडी नजर असते. वरचेवर त्याची तपासणी तसेच, कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंबा विक्रेत्यावर कारवाईदेखील केली जाते. पिंपरी-चिंचवड शहरात कोकणातून तसेच, पुणे आणि वाशी मार्केट या परिसरातून मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीसाठी येत असतो. त्याचप्रमाणे परप्रांतीय नागरिकदेखील आंबे विक्रीसाठी चौकाचौकात थांबलेले दिसून येतात. मात्र, हे आंबे नेमके नैसर्गिक पिकवले आहेत का, तसेच त्याची योग्यता याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम असतो. यावर दरवेळी एफडीए प्रशासन बाजारात जाऊन तपासणी करत असते. मात्र, यंदा अशी कोणती कारवाई अथवा तपासणी केल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळे हंगाम संपत आला तरी कारवाई नसल्याने शहरात भेसळयुक्त आणि अपरिपक्व आंबे विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे.

कॅल्शियम कार्बोनेटचा वापर जोरात

एफडीएकडून बाजारातील फळविक्रेत्यांना बैठक घेऊन सूचना केल्या जातात. आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा वापर केला जातो. असा आंबा खाण्यास अपायकारक असतो. अन्न व औषध प्रशासनाचे संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईबाबत विचारले असता, यंदा आंब्यांबाबत कोणती कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे यंदाच्या हंगामात अपरिपक्व आणि भेसळयुक्त आंबे विकणाऱ्यांना तसेच कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करणाऱ्या विक्रेत्यांना खुली सूट असल्याचे दिसून येते. 

मंडईतूनच खरेदी करा आंबा

शहरातील नागरिकांनी रस्त्यावर अथवा घरोघरी फिरणाऱ्या व्यक्तींकडून आंबा खरेदी करताना त्याची तपासणी करावी. अन्यथा कर्नाटक हापूस हा देवगड हापूस म्हणून ग्राहकाच्या माथी मारला जातो. नागरिक त्याला बळी पडतात. चांगला आंबा हवा असल्यास शहरातील मंडई, बाजारपेठ येथूनच खरेदी करण्याचे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.

"कार्यालयातील संपूर्ण मनुष्यबळ हे निवडणुकीच्या कामात गुंतलेले आहे. त्यामुळे आंब्याची तपासणी तसेच कारवाई झालेली नाही. निवडणुकीच्या कामाचा ताण कमी झाल्यानंतर यासंदर्भात कारवाई करण्यात येईल. तशा सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत."
- सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग

"बाजारात वेळोवेळी तपासणी करण्यात येते. नियम  पाळत नसल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येते. विक्रेत्यांना आंब्याची माहिती आणि त्याच्या नावाची पाटी त्यासमोर ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने नेमून दिलेल्या अटीनुसार आंबा पिकवण्यात यावा, असेदेखील कळवले आहे."
- आर. एस. शिंदे, भरारी पथक विभागप्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest