PUNE:पालिकेकडून मिळकतींची तपासणी; भाडेकरू आढळून आल्यास ४० टक्के सवलत नाकारली जाणार

पुणे महापालिका हद्दीतील ज्या मिळकतदारांनी त्यांच्या मिळकतीमध्ये भाडेकरू ठेवले असतील, त्यांनी मिळकतकरात दिली जाणारी ४० टक्के सवलत नाकारली जाणार आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या कर आकारणी विभागाने मिळकतींचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

PMC

संग्रहित छायाचित्र

करआकारणी विभागाकडून सर्वेक्षण सुरू

पुणे महापालिका हद्दीतील ज्या मिळकतदारांनी त्यांच्या मिळकतीमध्ये भाडेकरू ठेवले असतील, त्यांनी मिळकतकरात दिली जाणारी ४० टक्के सवलत नाकारली जाणार आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या कर आकारणी विभागाने मिळकतींचे सर्वेक्षण सुरू केले आहे.

महापालिकेने हद्दीतील मिळकतदारांना ४० टक्के सवलत मिळण्यासाठी नागरिकांना ते स्वतः राहात असलेल्या मिळकतीचे पुरावे व ‘पीटी ३’ अर्ज भरण्यास सांगितले होते. त्यानुसार मिळकतींचे सर्वेक्षण करून संबंधित मिळकतीत स्वत: मालक राहात असल्यास सवलत दिली जाणार आहे. जर मिळकतीत भाडेकरू ठेवण्यात आले असतील संबंधित मिळकतदाराला नियमानुसार कर भरावा लागणार आहे.  करआकारणी विभागाने पहिल्या टप्प्यात वडगाव धायरी, वडगाव बुद्रुक व हिंगणे या भागातील मिळकतींची पाहणी प्रायोगिक तत्त्वावर सोमवारपासून (दि.६) सुरू केली आहे.

महापालिकेने हद्दीतील मिळकतदारांना ही सवलत मिळण्यासाठी नागरिकांना ते स्वतः राहात असलेल्या मिळकतीचे पुरावे व ‘पीटी ३’ अर्ज भरून जवळच्या क्षेत्रीय कार्यालयासह मुख्य कार्यालय, नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक, विभागीय निरीक्षकांकडे २५ रुपये शुल्क भरून जमा करण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. अर्जात भरलेल्या माहितीची आणि सादर केलेल्या कागदपत्रानुसार तपासणी करण्यात येत आहे.

सोमवारी ११०० मिळकतींची तपासणी करण्यात आली. या तपासणीसाठी  ५ विभागीय निरीक्षक, १० पेठ निरीक्षकांचे पथक तयार करण्यात आले असून प्रशासन अधिकारी रवींद्र धावारे हे पथक प्रमुख म्हणून काम पाहात आहेत. मिळकतधारक स्वतः राहात असल्यास त्यांच्याकडून ४० टक्के सवलतीचा ‘पीटी ३’ अर्ज नागरिकांना हस्तांतरित करण्यात येत आहे, अशी माहिती कर आकारणी विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

राज्य सरकारने पुणेकरांना लागू असलेली १९७० पासूनची मिळकतकराची ४० टक्के सवलत काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात ज्या नागरिकांचे दोन फ्लॅट आहेत किंवा भाडेकरू ठेवले आहेत, अशा ९७ हजार मिळकतींचा समावेश करण्यात आला. त्यांना २०१९ ते २०२२ या तीन वर्गातली ४० टक्के सवलतीची रक्कम फरकासह भरण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार महापालिकेने आवाहन केल्याप्रमाणे नागरिकांनी ‘पीटी ३’ अर्ज दाखल केला होता. आता या अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांची तसेच स्वत: मालकच राहात आहे का याची पाहणी केली जात आहे.

महापालिकेला प्रामुख्याने मिळकतकरात अधिक उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे महापालिकेकडून कडक कर आकारणी मोहीम राबविण्यात येत आहे.  शहरातील अनेक मिळकतदारांनी कर भरण्यासाठी वेळोवेळी महापालिकेकडून आवाहन करण्यात येत आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest