कर्नाटक निवडणुकीवर धंगेकरांची प्रतिक्रिया
कर्नाटकातील जनतेने काँग्रेसवर विश्वास ठेवला आहे, ही क्रांती आहे. वारं आता बदलत चालले आहे. याची सुरूवात कसब्यातून झाली आहे. देशाचा पंतप्रधान देखील आता बदलणार आहे, अशी प्रतिक्रिया पुण्यातील कसबा पेठेचे काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी दिली आहे.
कर्नाटका विधानसभा निवडणूकीत काँग्रेसने मुसंडी मारली आहे. त्यामुळे पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी डीजे तालावर कार्यकर्ते आणि पदाधिकारी थिरकताना दिसले. यात आमदार रविंद्र धंगेकरांनी फुगडी देखील खेळली. यावेळी माध्यमांशी बोलताना धंगेकर म्हणाले की, “हार जीत ही राजकारण असते, ज्या पद्धतीने भाजपचे राजकारण सुरू आहे ते चुकीचे आहे. कर्नाकात जनतेने भाजपला चपराक दिली आहे. हीच क्रांती देशामध्ये राहणार आहे.”
पुढे ते म्हणाले की, “जनतेने ओळखले आहे की भाजप हे खोटे सरकार आहे, खोट आश्वासने देणार सरकार आहे. हुकूमशाहीकडे नेणारे सरकार आहे. यापुढे काँग्रेसवर लोकांनी विश्वास ठेवला आहे. हे बदलाचे वारे आहे. ही क्रांती आहे. वारं आता बदलतं चाललं आहे. याची सुरूवात कसब्यातून झाली आहे. देशाचा पंतप्रधान देखील आता बदलणार आहे, ही वस्तूस्थिती नक्की आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येत आहे, जनतेचे सरकार येत आहे. ही स्थिती देशातही राहणार आहे. आज जरी निवडणूका झाल्या तर जनता ही काँग्रेसच्याच बाजून राहणार आहे”, असेही धंगेकर यावेळी बोलतना म्हणाले.