संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी (दि. २०) पार पडलेल्या मतदानानंतर निवडणूक आयोगाने एकूण मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे. पुणे जिल्ह्यासह शहरातील आठही जागांवर मतदानाची टक्केवारी वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघात ६१.०५ टक्के मतदान झाले. तर, शहरातील आठ मतदारसंघात ५४.०३ टक्के मतदान नोंदवले गेले. मागील विधानसभेच्या निवडणुकीत पुण्यात ४८ टक्के मतदान नोंदवण्यात आले होते. तर, जिल्ह्यातील सर्व २१ जागांवर एकूण ५८ टक्के मतदान झालेले होते. यंदा मात्र, ग्रामीण भागात ३ टक्के, तर शहरात ६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मतदानाचा वाढलेला हा टक्का नेमका कोणाला धक्का देणार, हे येत्या २३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निकालाअंती स्पष्ट होणार आहे.
वडगावशेरीत मतदारांचा उत्साह; ५५.७१ टक्के मतदान
वडगावशेरी मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटात प्रमुख लढत झाली. महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या थेट लढत पहायला मिळाली. दोन्ही उमेदवारांनी लावलेली ताकद आणि मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यात आलेले यश यामुळे या भागात एकूण ५५.७१ टक्के मतदान झाले. गेल्या विधानसभेच्या तुलनेत सुमारे ९ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. २०१९ च्या निवडणुकीत ४६.९७ टक्के मतदान झाले होते. शहरातील एकूण आठ मतदारसंघांमध्ये वडगावशेरीमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत टिंगरे यांनी भाजपचे जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. यावेळी टिंगरे आणि पठारे यांच्या चुरशीच्या लढाईत दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर वैयक्तिक टीका केल्याचे दिसून आले. उपमुख्यमंत्री अजित पवारांना दोन वेळा सभा घ्यावी लागली. तर, पठारे यांच्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सभा घेतल्या होत्या. काही वादळी प्रकरणे, पक्ष बदल आणि निष्ठा तसेच स्थानिक प्रश्न यावर आधारलेली ही निवडणूक कोण जिंकणार याकडे लक्ष लागले आहे.
हडपसर मतदारसंघात सर्वांत कमी मतदान
हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पहायला मिळाली. अजित पवार गटाचे चेतन तुपे तर शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप एकमेकांसमोर उभे होते. या मतदारसंघाचा पूर्वेतिहास पाहता प्रत्येकवेळी नवीन उमेदवाराला संधी मिळते असे दिसते. यंदाही हाच शिरस्ता कायम राहणार की आहे तोच आमदार पुन्हा निवडला जाणार याकडे लक्ष लागले आहे. मतदारसंघात विजयाची गणिते ही जातीय समीकरणांवर आधारित असतात. माळी आणि मुस्लिम समाजासह दलित समाजाची मते ज्या उमेदवाराकडे अधिक त्याचा विजय निश्चित होतो. यंदा दोन्ही उमेदवारांनी ताकद लावली होती. परंतु, अपेक्षेप्रमाणे मतदानाचा टक्का वाढला नसल्याचे दिसून आले. या मतदारसंघात शहरातील सर्वांत कमी ५०.११ टक्के मतदान झाले. मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्यामुळे मतांचे विभाजन होणार आहे.
कसबा पेठेत सर्वाधिक मतदान
विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा मतदारसंघ कॉंग्रेसने काबीज केला होता. त्यामुळे या निवडणुकीत भाजपने पराभवाचा वचपा काढायचा चंग बांधला होता. त्यासाठी भाजपने घरोघरी प्रचार करण्यावर भर दिला होता. या लढतीत कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने या दोघांपैकी कोणाचा विजय होणार याकडे लक्ष लागले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले. सर्वांनी उत्साहात मतदान केल्याचे चित्र दिसत होते. कसबा पेठ मतदारसंघात सर्वाधिक ५८.७६ टक्के मतदान झाले. विशेषत: पेठ भागातील टक्का चांगला होता. दीड वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा पेठेत ५०.६ टक्के मतदान झाले होते. तर, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कसबा पेठेत ५१.५४ टक्के मतदान झाले होते. मागील पोटनिवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत मतदानात ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा मनसेचे गणेश भोकरे देखील मैदानात होते. त्यामुळे ही लढत तिरंगी झाली. भोकरे यांच्या उमेदवारीचा फायदा कोणाला मिळणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.
खडकवासल्यात उच्चांकी मतदानाची परंपरा कायम; ५६.५३ टक्के मतदान
शहरी आणि ग्रामीण भागात मोडणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाने या निवडणुकीतही उच्चांकी मतदानाची परंपरा कायम ठेवली आहे. खडकवासला भागात शहरातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक ५६.३३ टक्के मतदान झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत ५१.३५ टक्के मतदान झाले होते. यावेळी त्यात ५ टक्के वाढ झाली. बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या खडकवासला मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश होतो. या जागेवर तीनवेळा भाजपचे आमदार राहिलेले भीमराव तापकीर यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पार्टीचे सचिन दोडके, मनसेचे मयुरेश वांजळे यांच्यात लढत झाली. वांजळे यांच्या उमेदवारीने या लढतीत रंगत आणली. स्थानिक समस्या, ग्रामीण भागातील प्रश्न, नव्याने विकसित असलेला भाग आदी विषयांवर ही लढत महत्वपूर्ण ठरली. वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा कोणाला होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पर्वतीमध्ये ५५.२६ टक्के मतदान; दोन्ही प्रमुख उमेदवारांकडून विजयाचा दावा
पर्वती विधानसभा मतदारसंघात महिला विरुद्ध महिला अशी जिल्ह्यातील एकमेव लढत झाली. भाजपच्या तीनवेळा आमदार असलेल्या माधुरी मिसाळ विरुद्ध राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) अश्विनी कदम यांच्यात हा सामना झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही या दोघींचा सामना झाला होता. पर्वती मतदारसंघात ५५.२६ टक्के मतदान झाले. मागील विधानसभा निवडणुकीत ४९ टक्के मतदान झाले होते. मात्र, या निवडणुकीत मतदानात ६ टक्क्यांनी वाढ झाली. या निवडणुकीत पर्वती मतदारसंघात तिरंगी लढत झाली. कॉँग्रेसचे माजी गटनेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी बंडखोरी केली. त्यांनी शेवटपर्यंत माघार न घेता निवडणूक लढवली. बागूल किती मते खाणार याची चर्चा संपूर्ण निवडणुकीत रंगलेली होती. मिसाळ सलग चौथ्यांदा आमदार होण्याचे ‘रेकॉर्ड’ करणार की कदम बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
पुणे कॅंटोन्मेंटमध्येही मतदानाने पन्नाशी ओलांडली
पुणे कॅंटोन्मेंट हा अनुसुचित जातीसाठी (एससी) राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मागील तीन वर्षांचा विचार केला असता ५० टक्के मतदानाचा आकडा देखील ओलांडला नव्हता. यंदा मात्र या मतदारसंघात ५० टक्क्यांचा आकडा ओलांडला असून २०१९ च्या यंदा साडेनऊ टक्क्यांहून अधिकची वाढ झाली. २०१९ ला ४३.२८ टक्के मतदान झाले होते. यंदा ५२.८५ टक्के मतदान झाले. भाजपचे आमदार सुनील कांबळे आणि कॉंग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे यांच्यात थेट लढत झाली. लोकसभेला या मतदारसंघातून सुमारे साडेतेरा हजारांचे मताधिक्य कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मिळाले होते. त्यामुळे अशीच परिस्थिती विधानसभेला राहणार असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे सुनील कांबळे यांनी जोरदार प्रचार केला होता. भाजपनेही त्यांच्यावर विश्वास ठेवत पुन्हा उमेदवारी दिली. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा वाढलेले मताधिक्क्य कोणाच्या पारड्यात पडणार हे शनिवारीच समजणार आहे.
कोथरुडमधील वाढलेल्या ४ टक्क्यांचा लाभ कोणाला?
कोथरूडमधील मतदान यंदा चार टक्क्यांनी वाढल्याचे पहायला मिळाले. २०१९ ला ४८.१७ टक्के मतदान झाले होते. त्यात यंदा ४ टक्के वाढ होत ५२.१८ टक्के मतदान झाले. भाजपचे चंद्रकांत पाटील आणि शिवसेना 'उबाठा'कडून चंद्रकांत मोकाटे यांच्यात थेट लढत झाली. २०१९ ला चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मनसेचे किशोर शिंदे होते. शिंदे यांनी चांगली लढत दिली होती. त्यामुळे यंदाही किशोर शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. पाटील-मोकाटे- शिंदे अशी तिरंगी लढत या मतदारसंघात होत आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरुडमध्ये पाटील यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. परंतु, या दोघांनी देखील जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळे पाटील यांच्यापुढे आव्हान उभे राहिले आहे. कोथरुडमध्ये यंदा वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार हे आता शनिवारीच समजणार आहे.
शिवाजीनगरला बंडखोरीचा ‘फॅक्टर’ ठरणार निर्णायक
शिवाजीनगर मतदारसंघात २०१९ मध्ये ४३.९६ टक्के मतदान झाले होते. यंदा त्यात सुमारे ६.९४ टक्के वाढ होत ५०.९० टक्के मतदान झाले. या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीची चर्चा आता मतदारसंघात रंगली आहे. भाजपचे विद्यमान आमदार सिध्दार्थ शिरोळे आणि कॉंग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्यात थेट निवडणुक होईल असे बोलले जात होते. परंतु कॉंग्रेसच्या मनीष आनंद यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे निवडणुक रंगतदार झाली. मनीष आनंद यांनी जोरदार प्रचार करत स्पर्धेत असल्याचे सिध्द केले. त्यांच्या बंडखोरीचा आणि वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा होणार असल्याचा दावा शिरोळे आणि बहिरट यांनी केला आहे. त्यामुळे या वाढीव मतदानाचा फायदा कोणाच्या पारड्यात जावून पडणार हे शनिवारी दुपारनंतर स्पष्ट होणार आहे.