संग्रहित छायाचित्र
पुणे : यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी पार पडले. यंदा मतदानाचा टक्का वाढल्याचे पाहायला मिळाले. या निवडुकीत आपापले बलाबल आजमावलेल्या उमेदवारांच्या ‘उतावीळ’ कार्यकर्त्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रतीक्षा करण्याएवढा देखील धीर धरवत नाही. निकालाआधीच आपापल्या उमेदवारांच्या विजयाचे फलक आणि होर्डिंग लावण्याची एकप्रकारे स्पर्धाच लागली आहे. काही ठिकाणी तर उमेदवारांच्या विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून पाडला जाणारा हा पायंडा भविष्यात निवडणूक आयोगाच्या निकालांवर परिणाम करणारा ठरू शकतो. एकप्रकारे हा निवडणूक आयोगावर ‘प्रेशर’ पाडण्याचा प्रयत्न आहे की काय अशी शंका देखील उपस्थित होऊ लागली आहे. उमेदवारांनीच या प्रकारांना आळा घालण्याची आवश्यकता आहे.
विधानसभेच्या रणधूमाळीची बुधवारी संध्याकाळी ६ वाजता सांगता झाली. आता फक्त निकालांची प्रतीक्षा आहे. येत्या शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विजयाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हे त्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. निकालाची ही उत्सुकता काही कार्यकर्त्यांना पेलवताना दिसत नाही. मतदानानंतर लगेचच आपापल्या उमेदवारांच्या विजयाचे फलक झळकावण्यास सुरुवात झाली. आचारसंहितेच्या काळात फ्लेक्समुक्त झालेले शहर पुन्हा विद्रूप होण्यास सुरुवात झाली आहे.
शिवाजीनगर, खडकवासला, पर्वती, कोथरूड आदी मतदारसंघात आपल्याच विजयाचा दावा करणाऱ्या उमेदवारांचे अभिनंदन करणारे फ्लेक्स लावण्यास सुरुवात झाली आहे. खडकवासला मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) सचिन दोडके यांना खांद्यावर घेत वारजे येथे विजयी मिरणुक काढण्यात आली. तसेच त्यांच्या विजयाचे फलक देखील लावण्यात आले. तर, कार्यकर्त्यांनीही कार्यालयाबाहेर आनंदोत्सव साजरा केला.
तर, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आणि कोथरूडचे भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन करणारे बॅनरही लावण्यात आले आहेत. हे बॅनर माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी लावले आहेत. दोन्ही नेत्यांचे एकत्र फोटो असलेले त्यांचे अभिनंदन करणारे बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. ‘अखंड विकासाचे कमळ फुलले’ असा मजकूर त्यावर लिहिलेला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या उमेदवार अश्विनी कदम यांचेही बॅनर निकालापूर्वी लावण्यात आले आहेत. नवनिर्वाचित आमदार असे त्यांचे वर्णन करण्यात आले आहे. यासोबतच भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या विजयाचे फलक देखील गुलटेकडी भागात लावण्यात आल्याचे पहायला मिळाले.
निवडणूक आयोगाने याविषयी दखल घेऊन कारवाई करण्याची आवश्यकता अभ्यासक व्यक्त करीत आहेत. यासोबतच महापलिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने याकडे डोळेझाक न करता कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे देखील या जाणकारांचे मत आहे.
अजित दादा पवार यांचे मुख्यमंत्रीपदाचा बॅनर
पुणे शहरातील मार्केट यार्ड येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थकांनी ‘मुख्यमंत्री अजितदादा पवार’, ‘विकासाचा वादा... अजितदादा’ अशा आषयाचे होर्डिंग लावले आहे. पर्वती संघाचे अध्यक्ष संतोष नांगरे यांच्या कार्यकर्त्यांनी ही बॅनरबाजी केली आहे.