मतदान उरकले, प्रशांत जगताप देवदर्शनाला; म्हणाले, आजचा दिवस कुटुंबासाठी...
बुधवारी (२० नोव्हेंबर) महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. त्याआधी महिनाभर सर्व पक्षांचे उमेदवार प्रचारात व्यस्त होते. मतदानानंतर दुसऱ्या दिवशी काही उमेदवार आपले कुटुंब, मित्रांसोबत वेळ घालावताना दिसत आहे. येत्या २३ तारखेला मतमोजणी होवून निकाल लागणार आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी मतदान पार पडल्यावर दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) कुटुंबासमवेत वेळ घालवला. तसेच त्यांनी सपत्नीक आध्यात्मिक गुरूंचे दर्शन घेऊन देवदर्शन केले.
प्रशांत जगताप म्हणाले की, गेल्या जवळपास महिनाभरापासून विधानसभा निवडणुकीची धावपळ सुरू होती. स्वत: उमेदवार असल्याने ही धावपळ अधिक वाढलेली होती. या संपूर्ण कालावधीत कुटुंबाला वेळ देता येणं शक्यच नव्हतं. उलट कुटुंब रंगलंय प्रचारात... अशीच माझ्या कुटुंबाची अवस्था होती. त्यामुळं, जे काही बोलणं, भेटणं व्हायचं त्यात राजकीय चर्चा, प्रचाराची स्थिती, आज प्रचारासाठी आणि गाठीभेटींसाठी कोण कुठं जाणार आहे, हाच मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी असायचा. आई, वडील, भाऊ, वहिनी, मुलगा, पुतणे, नातेवाईक, सहकारी, मित्र परिवार, कार्यकर्ते अशा सर्वांनीच प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली होती. माझी पत्नी अमृता तर खांद्याला खांदा लावून लढत होती. प्रसंगी माझ्या पुढे दोन पावले जाऊन तिने प्रचार केला. माझे कुटुंबीय तर प्रचारात होतेच, पण तुमच्या सर्वांशिवाय हा प्रचार अपूर्ण होता. तुम्ही सर्वांनीही खूप कष्ट घेतले. त्यामुळे, दिवसेंदिवस आपल्या सर्वांचाच विश्वास वाढत जात होता.
जगताप पुढे म्हणाले की, अखेर बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण असेल, याचा फैसला मतपेटीत बंद झाला. बुधवारी दिवसभर मतदारसंघातील बूथवर भेट देऊन आढावा घेत होतो. रात्री उशिरापर्यंत अनेकांचे फोन सुरू होते. त्या प्रत्येकांशी संवाद साधत होतो. मला भक्कम साथ दिल्याबद्दल आभार व्यक्त करीत होतो. आता शनिवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. त्यात आपला विजय होईल, हा विश्वास आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण सर्वचजण राजकीय जबाबदाऱ्यांमध्ये व्यग्र असू. त्यामुळे, काल असंच ठरवलं होतं की गुरुवारचा दिवस कुटुंबासाठी आणि स्वत:साठी द्यायचा. लाँग ड्राइव्हवर निघायचं. अध्यात्मिक दर्शन, प्रवास, निसर्ग पर्यटन यातून मला नेहमीच एक नवी ऊर्जा मिळत असते. त्यामुळं, गुरुवारी सकाळीच पत्नी अमृतासमवेत माझ्या आवडीचं ठिकाण असलेल्या सोलापूर जिल्ह्यात दाखल झालो. खरं तर अमृताला हे नियोजन अचानक कळाल्यानं तिच्यासाठी हा एक सुखद धक्काच होता.
अध्यात्मिक गुरूंचं दर्शन घेतलं. देवदर्शन घेतलं. प्रवासाचा आणि निसर्ग पर्यटनाचा आनंद घेतला. सोलापुरात मिसळीचा आस्वाद घेतला. प्रवासानं, अध्यात्मिक, देवदर्शनानं जसं आत्मिक समाधान मिळालं, तसंच मिसळीचा मनमुराद आनंद घेऊन चवीचंही समाधान मिळल्याचं जगताप यांनी सांगितले.
खरं सांगायचं तर पर्यटन, अध्यात्मिक गुरूंचा सहवास आणि देवदर्शन हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळं, शक्य तेव्हा आणि वेळ काढून कुटुंबासमवेत प्रवास करत राहतो. माझ्या मित्र – परिवाराला व पक्षासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनाही मी हे आवर्जून सांगत असतो की वेळ मिळेल तेव्हा किंबहुना ठरवून कुटुंबासमवेत प्रवासाचा, पर्यटनाचा आनंद घ्या. यातून एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मिळते. मन अगदी रिफ्रेश होतं. नव्या आव्हानांना तोंड देता येतं. ही ऊर्जा, ही उमेद, हे समाधानच आपल्याला सकारात्मक जगण्याचं बळ देत राहतं. हीच ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या सेवेसाठी हजर झालो आहे, असे जगताप म्हणाले.