संग्रहित छायाचित्र
विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील एकूण २१ मतदारसंघामध्ये मतदान पार पडले. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारयाद्यांमध्ये नाव नसणे, नाव वेगळे फोटो वेगळे, पत्त्यांमधील गोंधळ झाला होता. त्यामुळे हजारो मतदारांना मतदान करता आले नव्हते. त्यामुळे मतदारयाद्यांमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी विशेष यंत्रणा राबवण्यात आली
होती. परिणामी पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण ११ लाख ४ हजार ५७२ मतदारांनी मतदान केले होते. त्यामध्ये तब्बल ७ लाख ९३ हजार ३४२ मतदारांची भर पडल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिली.
पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये ५४.०३ टक्के मतदान झाले होते. तर विधानसभेसाठी पुण्यात सरासरी मतदानाची टक्केवारी ६१.०५ टक्के इतकी झाली आहे. तुलनात्मक दृष्टीने लोकसभा मतदारसंघात एकूण ११ लाख ४ हजार ५७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामध्ये ७ लाख ९३ हजार ३४२ मतदारांची भर पडल्यामुळे ७ टक्क्यांनी मतदान वाढल्याचे समाधान असल्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांनी सांगितले.
लोकसभेत सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदारयाद्यांमध्ये गोंधळ होता. त्याची गंभीर दखल घेत ६० हजार अर्ज भरून घेतले होते. परिणामी ५ लाख १३ हजार ८४३ नव्या मतदारांची भर पडली. तसेच पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते.तब्बल २५०० हून जास्त अशी मतदान केंद्रे आम्ही ओळखली ज्या ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते. त्याठिकाणी त्यासाठी विशेष मतदार जनजागृती अभियान, कमी अंतरावर मतदान केंद्रांची उभारणी, रहिवासी सोसायट्यांमध्ये मतदानकेंद्र उभारण्यात आले होते. त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी वाढली,असेही त्यांनी सांगितले.
गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रांमुळे मतदार घराबाहेर पडल्याचे चित्र दिसून आले. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या तब्बल २५१०५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले. त्यापैकी ११४५८ पोलिसांनी मतदानाचा हक्क बजावला. ८५ वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या एकूण १८४४ ज्येष्ठ नागरिकांना गृहमतदानाची संधी उपलब्ध करून दिली होती. ३१० दिव्यांग मतदारांनीही घरातून मतदानाचा हक्क बजावला. तसेच भारतीय लष्करातील सैनिकांचे ५५०५ मतदान झाले असून ऑनलाईन ईटीबीपीएस सुविधेतून ४३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्यामुळे मतदान सुरळीत पार पडल्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांनी सांगितले.
मतमोजणीची जय्यत तयारी
पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी भारतीय खाद्य निगम कोरेगाव पार्क येथील गोदामात ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळचे ईव्हीएम श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल बालेवाडी येथे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. तर ज्या त्या तालुक्यात जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. येत्या शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. टपाली मतमोजणी नंतर ईव्हीएमच्या मतमोजणी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिली.