संग्रहित छायाचित्र
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 ला अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका वाल्मिक कराड याच्यावर आहे. कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्तीय समजला जातो. राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. मित्राने गुन्हा केला म्हणून मोठ्या नेत्यावर आरोप करणे अयोग्य असल्याचे भरणे यांनी म्हटले आहे.
भरणे म्हणाले, या प्रकरणात मी अधिक न बोलणे योग्य ठरेल. या घटनेचा तपास सुरू आहे. काळ वाल्मिक कराड शरण गेलेले आहेत. जो दोषी असेल त्याच्यावर शंभर टक्के कारवाई केली जाईल.
भरणे पुढे म्हणाले, कुणी काहीही म्हटले तरी धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसावा हे निश्चित आहे. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे यांचे नेते आहेत. प्रत्येक नेत्याचा मित्र किंवा कार्यकर्ता असतो. म्हणून त्या मित्राने किंवा कार्यकर्त्याने काही केले म्हणजे त्यात त्या वरच्या नेत्याचा काही दोष असतो असे नाहीये. तपासात सगळं समोर येईल. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसावा असे मला वाटते.