संग्रहित छायाचित्र
पुणे : महाराष्ट्रात महावितरणला सर्वात जास्त महसूल मिळवून देणाऱ्या देशातील पहिली स्मार्ट सिटी म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या पुणेकरांना २०५१ तास अंधारात राहावे लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुलै २०२४ या संपूर्ण महिन्यात संपूर्ण पुणे झोनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे वीज खंडित होण्याच्या १३१४ घटना घडल्या. ज्यात पुण्यातील ग्राहकांना एकूण २०५१ तास अंधाराचा सामना करावा लागला. तर ऑक्टोबर २०२४ या संपूर्ण महिन्यात संपूर्ण पुणे झोनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे वीज खंडित होण्याच्या १६१६८ घटना घडल्या ज्यात पुणे विभागातील ग्राहकांना एकूण ८७६६ तास अंधाराचा सामना करावा लागला. अशी माहिती महावितरण जाहीर केली आहे.
वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे महावितरणने दरमहा विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्द करणे आवश्यक आहे. यातून ग्राहकांना किती तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागले व त्यामुळे किती काळ अंधारात बसावे लागले हे समजते. महावितरणने त्यांच्या संकेतस्थळावर जुलै २०२४ नंतर हे निर्देशांक गेल्या पाच महिन्यांपासून प्रसिद्ध केलेले नव्हते. यापूर्वी तक्रार केल्यानंतर महावितरणने निर्देशांक प्रसिद्ध केले होते. त्यामुळेनिर्देशांक प्रसिध्द करण्यासाठी तक्रार का करण्याची का वेळ येते, असा संतापजनक सवाल सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला होता. याबाबतचे वृत्त सीविक मिररने प्रसिध्द केले होते. त्यानंतर महावितरण तात्काळ माहिती प्रसिध्द केली आहे. यामाहितीनुसार पुणेकरांना २०५१ तास अंधारात राहावे लागले. तर एकूण राज्यातील ग्राहकांना एकूण ६७८१५ तास अंधाराचा सामना करावा लागला. यामुळे आता महाविरणचा उदासीन कारभार समोर आला आहे.
महावितरणने जुलै २०२४ नंतर मासिक विश्वासार्हतेचे निर्देशांक प्रसिध्द केले नसल्याची तक्रार वेलणकर यांनी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे केली होत. आज ३ जानेवारी रोजी दुपारी महावितरणने तातडीने ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर २०२४ या तीन महिन्यांचे विश्वासार्हतेचे निर्देशांक त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. आता प्रश्न हा उभा राहतो की ही माहिती तयार असून इतके दिवसांत संकेतस्थळावर का प्रसिद्ध केली नाही. दरवेळी कान पिळल्यावरच काम करायची सवय महावितरणला लागली आहे का. माहितीवरुन ऑक्टोबर २०२४ चे प्रसिद्ध केलेले निर्देशांक जुलै २०२४ पेक्षा महावितरणचा कारभार आणखी ढासळल्याचे दिसून येत आहे. जुलै २०२४ या संपूर्ण महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात तांत्रिक बिघाडामुळे वीज खंडित होण्याच्या २३, ७६९ घटना घडल्या होत्या. ज्या ऑक्टोबर २०२४ मध्ये १, ०७, ०८८ एवढ्या झाल्या . जुलै २०२४ या संपूर्ण महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांना ३४,९९३ तास अंधाराचा सामना करावा लागला. तर ऑक्टोबर २०२४ या संपूर्ण महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांना एकूण ६७८१५ तास अंधाराचा सामना करावा लागला.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग हे विश्वासार्हतेचे निर्देशांक बघते का हा प्रश्न आहे. ढासळत चाललेल्या सेवेच्या दर्जाबद्दल महावितरणला जबाबदार धरून त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार या प्रश्नांची उत्तरे ग्राहकांना मिळणे आवश्यक आहे. - विवेक वेलणकर, अध्यक्ष- सजग नागरिक मंच पुणे.