संग्रहित छायाचित्र
पुणे : कांद्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नववर्षात हॉटेलसह हात-गाड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पदार्थाच्या किंमतीत वाढ केल्याचा फटका खवय्यांना बसणार आहे. तांदूळ, गहू, ज्वारी किंवा कडधान्याचे भाव वाढले, तर हॉटेल व्यावसायिकांना काय फरक पडतो? त्याचा भार तर ग्राहकांच्या खिशाला पडतो, असे मानले जात होते. मात्र सर्वसामान्यांप्रमाणे महागाईचा फटका हॉटेल व्यवसायालादेखील बसत आहे.
मागील महिन्यांपासून एक महिन्यांच्या कालावधीत कडधान्यांमध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांचे दरही प्रती किलो ७ ते १५ रुपयांनी वाढले आहेत, तर तूर, मसूर, मूग, हरभरा या डाळींनी शंभरी पार केली आहे. इतकेच काय तर तेलाचे भाव २ ते ३ रुपयांनी काहीसे कमी झाले असले तरी तेलाचे भाव ही १ लिटर १४० ते १४५ रुपये झाले आहेत. कांद्याच्या भाववाढीने हॉटेल व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
भाजी किंवा वडापाव तत्सम पदार्थांमध्ये कांदा लागत असल्याने छोट्या व्यावसायिकांनी वडापावच्या दरात ३ ते ५ रुपयांनी वाढ केली आहे. किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात किलोमागे ५ ते ७ रुपयांनी वाढ झाल्याने नागरिकांना नाश्त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. खानावळीमध्येही काही पदार्थ महागले असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे.
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या स्वागतात हॉटेल व खानावळ तसेच घरगुती खानावळ चालकांनी दरात वाढ केली असून, हे दरवाढ सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने आता घरगुती खानावळीमध्ये जेवण करणे अवघड झाले आहे. घरगुती खानावळ राइस प्लेट दर ७० वरून ९० रुपये, तर हॉटेलमधील ११० रुपये १३० रुपये झाल्याने वाढत्या महागाईला सामान्य नागरिक हैराण झाले आहेत.
पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, ‘महागाईचा फटका हॉटेल व्यावसायिकांना देखील बसला आहे. ४ ते ५ टक्क्यांपर्यंतची महागाई हॉटेलचालक सहन करू शकतात. मात्र सध्या १० ते १५ टक्क्यांनी गोष्टी महागल्या आहेत. कडधान्ये, पालेभाज्या महाग झाल्या असून, हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे कांदा. सध्या कांद्याचे भाव देखील वाढलेले आहेत. बटाट्यांच्या किमतीत १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने हॉटेलचालकांना हे परवडणारे नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टींमध्ये दर वाढ करणे हाच पर्याय आहे.’