कर्मचाऱ्यांना हिंदीत बोलण्याची सक्ती, पगार रखडवले; मनसेने मॅनेजरला शिकवला धडा
एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळा आहे. तर दुसरीकडे मराठीद्वेषाच्या घटना घडताना दिसत आहेत. मुंबईत आणि ठाण्यात परप्रांतियांनी मराठी माणसाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना आता पुण्यातही मराठी-हिंदी वाद उफाळून आला आहे. ऑफीसमध्ये मराठी बोललात, तर नोकरीवरून काढून टाकेन, अशी धमकी देणाऱ्या मॅनेजरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. पुण्यातील वाकडेवाडी परिसरात येथे ही घटना घडली आहे.
पुण्यातील वाकडेवाडी येथे एअरटेलचं कार्यालय आहे. या कार्यालयातील मॅनेजर शाहबाज अहमद याने काही मराठी मुलांवर अरेरावी केल्याचा प्रकार समोर आला होता. ऑफिसमध्ये हिंदीतच बोलण्याची सक्ती त्याने केली होती. गेले तीन महिने या कर्मचाऱ्यांचा पगारही त्याने रखडवून ठेवला होता. एवढंच नव्हे तर हिंदू सणांना सुट्टीही देणं बंद केलं होतं. यासंदर्भात या तरुणांनी मनसेशी संपर्क साधला होता. त्यानुसार मनसेचे राज्यसचिव आशिष साबळे पाटील यांनी एअरटेल कार्यालयातील व्यवस्थापकांशी संवाद साधला होता. याप्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आवाहन त्यांनी केले होते. तसे न केल्यास पुण्यातील तीन एअरटेलची कार्यालये फोडण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, तरीही पीडित तरुणांच्या समस्या सोडवण्यास वरिष्ठ कमी पडले.
अखेर वैतागलेल्या पीडित तरुणांनी पुन्हा मनसे कार्यालयात धाव घेतली. याप्रकरणी मनसेने तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली. मॅनेजरकडून मराठीत बोलण्यास नकार दिला जातोय. ऑफिसात हिंदीत बोलण्याची सक्ती केली जात असल्याचे या तरुणांनी सांगितले. तसेच, कोणत्याही सेनेला घेऊन या. तुमचा पगार देणार नाही. तुम्हाला कामावरून काढून टाकणार अशा धमक्या या मॅनेजरने दिल्याची माहिती मनसेच्या पदाधिकार्यांना देण्यात आली. मराठी भाषिक तरुणांवर अशाप्रकारे अन्याय होत असल्याने आशिष साबळे पाटील यांनी तत्काळ एअरटेलच्या ऑफिसात जाऊन संबंधित मॅनेजरशी चर्चा केली. मात्र त्याची अरेरावी सुरूच असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला.
त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी एअरटेल ऑफिसमध्ये घुसून या मॅनेजरला चांगलाच चोप दिला. मराठी तरुणांना त्रास दिला तर एकाचवेळी स्वारगेट, वाकडेवाडी, खराडी येथील एअरटेलची कार्यालये फोडू, असा इशाराच मनसे कार्यकर्त्यांनी दिला. या इशाऱ्यानंतर मराठी तरुणांचे पगार करण्यात आले आहेत. तसेच झालेल्या घटनेबाबत मॅनेजरने माफीही मागितली आहे.