पुणे : शहरातील १३ टेकड्यांची सुरक्षा वाढणार
पुण्यातल्या टेकड्यांवर फिरायला जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. लूटमार आणि बलात्कारासारखे गुन्हे अनेकदा घडत आहेत. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी टेकड्यांच्या सुरक्षेसाठी प्लान तयार केला आहे. याअंतर्गत १३ पेक्षा अधिक टेकड्या आणि सात पेक्षा अधिक ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत.
याठिकाणी सीसीटीव्ही आणि प्रकाशझोताच्या (फ्लड लाइट्स) माध्यमातून या जागांची सुरक्षा वाढविली जाणार आहे. पुणे शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी तत्कालीन गृहमंत्री फडणवीस यांनी शहरातील टेकड्या आणि अन्य ब्लॅक स्पॉट सुरक्षित करण्यासाठी आवश्यकतेनुसार स्वतंत्र निधी देण्याचे जाहीर केले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील तेरापेक्षा अधिक टेकड्या आणि सातपेक्षा अधिक ब्लॅक स्पॉट शोधण्यात आले. याठिकाणी करावयाच्या उपाययोजनांसंबंधी सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल येत्या सोमवारी (२ डिसेंबर) राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
आयपी बेस्ड कॅमेऱ्यांची नजर
टेकड्या आणि ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणांवर जवळपास ६०० अत्याधुनिक कॅमेरे बसवले जाणार आहेत. पीटीझेड कॅमेरे, फिक्स कॅमेरे आणि एएनपीआर कॅमेऱ्यांसह आयपी बेस्ड कॅमेऱ्यांचादेखील यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. आयपी बेस्ड कॅमेऱ्यांमध्ये सराईत गुन्हेगारांचे चेहरे कैद होणार असून ‘फेस रिडींग’ सिस्टीमद्वारे गुन्हेगारांची ओळख पटविली जाणार आहे.
पॅनिक बटनची सुविधा
‘ब्लॅक स्पॉट’वर कॅमेऱ्यांसह ‘पॅनिक बटन’ असणार आहे. पॅनिक बटन दाबताच थेट पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रूम) अलर्ट मिळणार आहे. पॅनिक बटणवर असलेल्या कॅमेऱ्यामुळे व्हिडिओ चित्रीकरणदेखील दिसण्यास सुरूवात होईल. बटण दाबण्याच्या एक मिनिट आधीचा आणि नंतरचा व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे चित्रीत होईल. बटण दाबताच त्या परिसरातील अन्य कॅमेरेदेखील अलर्ट मोडवर जातील. पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या वाहनातही अलार्म वाजेल. जेणेकरून गस्तीवरील पोलिसांना संबंधित ठिकाणी पोहोचण्यास मदत मिळेल.
‘टू वे पीए सिस्टीम’
टेकडीच्या भागांमध्ये ‘टू वे पीए सिस्टीम’देखील (माईक आणि स्पिकर) लावले जाणार आहेत. रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसावे म्हणून १७७ पेक्षा अधिक प्रखर प्रकाशझोत (फ्लड लाइट्स) लावले जाणार आहेत. सिटी सर्व्हेलान्सचे बेस्ट फिचर्स यात समाविष्ट करण्यात आले आहेत. कमीत कमी वेळेत पोलीस घटनास्थळी पोहोचावे, यासाठी सात विशेष मोबाईल सर्व्हेलान्स व्हेईकलदेखील तैनात करण्यात येणार आहेत. पोलिसांच्या या सातही वाहनांमध्ये ड्रोन कॅमेरे असणार आहे. त्यासाठी अंदाजे ७० कोटी रुपये खर्च येणार असून, चार वर्षांच्या देखभाल दुरूस्तीचादेखील समावेश असणार आहे. ज्या ठिकाणी रेंज नाही, आशा त्याठिकाणी ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी’द्वारे कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे.