दोन सख्खे भाऊ, दोघांच्या दाखल्यावर जातीच्या वेगळ्या नोंदी; शिंदे समितीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह !
पुणे : सरसकट कुणबी दाखले वाटप आणि ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सुरु केले आहे. आज उपोषणाचा नववा (Pune News) दिवस आहे. त्यात मराठा आणि कुणबी एकच आहे, यासंदर्भातील अनेक पुरावे शिंदे समितीला मिळाले आहे. त्याचवेळी पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील महाळूंगे येथे सख्ख्या भावांच्या शाळेच्या दाखल्यांवर जातीच्या वेगवेगळ्या नोंदी आढळून आल्या आहेत. यात एका भावाच्या दाखल्यावर कुणबी तर दुसऱ्याच्या दाखल्यावर मराठा नोंद केली आहे. यामुळे मराठा आरक्षणाच्या शिंदे समितीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मराठा आणि कुणबीमध्ये गोंधळ
मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण पेटलेले आहे. त्यानंतर ज्यांच्याकडे नोंदणीचे पुरावे असतील त्यांना राज्य सरकारकडून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. परंतु मराठा आणि कुणबींमध्ये देखील अनेक गोंधळ असल्याचे उघड झाले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील महाळुंगे गावात दोन सख्ख्या भावांच्या दाखल्यावर वेगवेगळ्या जाती नोंदवण्यात आल्या आहेत. एकावर कुणबी आणि आणि एकावर हिंदू मराठा अशी नोंद करण्यात आली आहे. जना कृष्णाजी आंबटकर याच्या दाखल्यावर कुणबी तर त्यांचा भाऊ सुदाम कृष्णाजी आंबटकर याच्या दाव्यावर हिंदू मराठा अशी नोंद केली आहे. यामुळे शिंदे समितीच्या अहवालावर प्रश्न निर्माण होणार आहे.
एका गावात ११२० नोंदी
आंबेगाव तालुक्यातील फक्त एका गावातच ११२० नोंदी आढळल्या आहेत. शाळेकडून सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. तसे पत्रही सादर केले गेले आहे. तालुक्यातील अनेक गावांच्या नोंदी अजून तपासल्या गेल्या नाहीत. भावाभावाच्या दाखल्यावर वेगवेगळ्या नोंदी असल्याचे अनेक प्रकार राज्यातही निघण्याची शक्यता आहे. काहींच्या नोंदी कुणबी केल्या गेल्या आहे. त्यानंतर त्यातील काही नोंदी मराठा म्हणून लावल्या गेल्या आहे. कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाल्यानंतर अनेक ठिकाणी तरुणांनी ते जाळून देखील टाकले आहे. मात्र, आंबेगाव तालुक्यातील दोन भावंडांची प्रमाणपत्र व्हायरल झाल्याने पुन्हा कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.