पीएमपीएमएलची पर्यटन बस
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) पर्यटन बससेवा क्र. २ चे रविवारी (दि. १४ मे) उद्घाटन करण्यात आले आहे. हडपसर गाडीतळ येथे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांच्या हस्ते या बसचे उद्घाटन करण्यात आले आहे.
यावेळी सहव्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा पोतदार-पवार, चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतीश गव्हाणे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, प्र. कामगार व जनता संपर्क अधिकारी अल्ताफ सय्यद, महामंडळाचे अधिकारी विजय रांजणे, शैलेश जगताप, मोहन दडस, समीर अत्तार, सुरेंद्र दांगट यांच्यसह इतर कर्मचारी उपस्थित होते. ही बस हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर या मार्गे धावणार आहे.
पीएमपीएमएलच्या पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर आणि १६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून धार्मिक तसेच पर्यटन स्थळांकरिता ७ पर्यटन बस मार्ग निश्चित केले आहेत. वातानुकूलीत ई-बसेसव्दारे विशेष 'पर्यटन बस' सेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी १ मे २०२३ पासून सुरू करण्यात आलेली आहे. या 'पर्यटन बस' सेवेकारिता प्रति प्रवासी तिकीट ५०० रुपये इतका आकारण्यात येत आहे.
यावेळी बोलताना महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया म्हणाले की, “पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सुरू करण्यात येत असलेल्या वातानुकूलीत पर्यटन बससेवेचा लाभ भक्तगण, भाविक व पर्यटक यांनी घ्यावा.”