स्वरमय वातावरणात 'सवाई गंधर्व ' चा प्रारंभ

पुणे, दि. १३ डिसेंबर २०२३ : उतरत्या मध्यान्ही स्वरमय वातावरणात बुधवारी ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ झाला.

SawaiGandharvaBhimsenfestival

स्वरमय वातावरणात 'सवाई गंधर्व ' चा प्रारंभ

परंपरेनुसार तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांनी राग मधुवंतीने सुरवात केली. मोजक्या स्वरावलींतून रागरूप मांडून त्यांनी दाद मिळवली. त्यांना तबला - कार्तिक स्वामी, निखिल तुकाराम दैठणकर सनई सहवादन, सूरपेटी - गणेश दैठणकर, तानपुरा - केतकी दैठणकर आणि मयुरी दैठणकर यांनी साथसंगत केली. 'वैष्णव जन तो' या भजनाच्या वादनाने त्यांनी सांगता केली.

यानंतर पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य आणि किराणा घराण्याचे गायक संजय गरूड यांनी गायनाची सुरुवात राग भीमपलास मधील 'अब तो बडी देर' या रचनेतून केली. रागवाचक आलापीतून भीमपलासचा स्वरविस्तार त्यांनी उत्तम मांडला. त्याला जोडून द्रुत त्रितालात 'बीरज मे धूम मचाए शाम' ही प्रसिद्ध बंदिश त्यांनी रंगवली. 'माझे माहेर पंढरी' या प्रसिद्ध अभंगाने त्यांनी भक्तिरसपूर्ण भाव निर्माण केले. त्यांना संवादिनी शांतीभूषण देशपांडे,  तबला रोहन पंढरपूरकर, तानपुरा -  प्रसाद कुलकर्णी  व ऋत्विक हिर्लेकर, पखवाज माऊली फाटक, सारंगी फारुख लतिफ खान तर गायनसाथ दिनेश माझिरे यांनी केली.

'सवाई' च्या स्वरमंचावर सुविख्यात गायक पं. कुमार गंधर्व यांना जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून कुमारजींच्या समृद्ध आणि प्रयोगशील गायन वारशाचे दर्शन घडवले. समयानुकूल अशा राग पूरियाधनाश्री मध्ये कलापिनी यांनी विलंबित एकतालात ख्यालाची मांडणी साधली. दोन्ही रचना पं. कुमार गंधर्व यांच्या होत्या. 'आजरा दिन डूबा' या बंदिशीतून सायंकालीन वातावरण मूर्तिमंत उभे राहिले. ' मृगनयनी तेरो यार री' ही रचना अतिशय ढंगदारपणे त्यांनी पेश केली. त्यानंतर राग हमीर मध्ये त्रितालात त्यांनी आक्रमक तानांचे पॅटर्न घेत हा उत्तरांप्रधान राग मोजक्या वेळात 'कैसे घर जाऊ लंगरवा' या रचनेतून खुलवला. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी पं. कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेली 'सुनता है गुरु ग्यानी' ही निर्गुणी रचना प्रस्तुत करत रसिकांना कुमारजींची आठवण करून दिली. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, संवादिनीवर सुयोग कुंडलकर यांनी अनुरूप साथसंगत केली. तानपुरा साथ वत्सल कपाळे आणि वैदेही अवधानी यांनी केली.

पं. तेजेंद्र नारायण मुजुमदार यांनी आपल्या धीरगंभीर सरोदवादनाने 'सवाई' च्या स्वरमंचावर पहिल्या दिवशीच्या उत्तरार्धात राग जयजयवंतीच्या माध्यमातून जणू स्वरसाम्राज्य निर्माण केले. आलाप, जोड, झाला या पारंपरिक क्रमाने त्यांनी राग जयजयवंतीची खुलावट केली. विलंबित त्रितालातील त्यांचे वादन जणू 'जयजयवंती' च्या कॅनव्हासवर रागवाचक स्वराकृती चितारत होते. त्यानंतर झपताल आणि द्रुत त्रितालातील वादनात त्यांनी लयकारीचे उत्तम दर्शन घडवले. सरोद आणि तबल्याची सवाल जवाबांची जुगलबंदीही रंगली.

'सवाई' च्या पहिल्या दिवसाची सांगता ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या स्वरसमृद्ध गायनाने झाली. राग दरबारीचे गंभीर सूर स्वरमंडपात निनादताच, रसिकांनी भरभरून दाद दिली. विलंबित तिलवाडा तालात निबद्ध 'दुलहन आज बनी'  या रचनेच्या माध्यमातून पं. कशाळकर यांनी दरबारीचे राजस रूप उलगडत नेले. द्रुत बंदिशीत त्यांनी तबल्याच्या साथीने लयकारीचे वैविध्यपूर्ण आविष्कार दर्शवले.त्यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी तबल्याची तर सुधीर नायक यांनी संवादिनीची रंगत वाढविणारी साथसंगत केली. 'वसंत' मधील 'फूली बनी बेलरिया' आणि 'फगवा ब्रिज देखन को चलो री' या रचनांतून ऋतूदर्शक बदलांचे यथार्थ वर्णन त्यांनी स्वराकृतींतून रसिकांना घडवले. तराणा सादर करून 'तुम हो जगत के दाता' या भैरवीने त्यांनी गायनाची सांगता केली. अद्वैत केसकर आणि ऐश्वर्य महाशब्दे यांनी तानपुरा आणि स्वरसाथ साथ केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest