दादागिरीने चैन हिसकवणाऱ्या चोरट्यांच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या
पुणे कॅम्प परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस जबरदस्ती करून गळ्यातील सोन्याची चैन हिसकवल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलीसांनी मुख्य आरोपीसह तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई बंडगार्डन पोलीसांनी शनिवारी (दि. १३) केली आहे.
शाहीद अब्दुल दाउत (वय १८, रा. राजु पुना जनरल स्टोअर्स जवळ, ताडीवाला रोड, पुणे), मनिष विनोद रजपूत आणि आयन ऊर्फ नविलाल मेहबुब शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील शाहीदला पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून मनिष आणि आयन हे विधी संघर्षीत बालक असल्याने त्यांना बालन्यायालय येरवडा येथे हजर करण्यात आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील न्यू मोदी खाना कॅम्प येथे ११ मे रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास आयबी चौकाजवळ विधानभवन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मयुरेश संदीप चव्हाण (वय २३) गप्पा मारत थांबले होते. यावेळी एका एक्टिव्हा दुचाकीवरून आलेल्या आरोपींने “ए काय करताय रे तिकडे” असे म्हणून एकाची कॉलर पकडली. तेव्हा मयुरेश हे पळून जात असताना आरोपींनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेली.
या प्रकरणाचा शोध घेत असताना पोलीसांनी संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्याच्या आधारे पोलीसांनी सापळा रचून तीघांना ताब्यात घेतले. यातील शाहीदने आपल्या साथीदारांच्या साहाय्याने चैन चोरल्याचे समोर आले. तसेच मनिष आणि आयन हे दोघेही अल्पवयीने असल्याने त्यांना बालन्यायालय येरवडा येथे रवानगी करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपीला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. सध्या बंडगार्डन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.