पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या परीक्षेत पुणे पोलीसांसह भरारी पथके दक्षता पथकांची मदत घेतली जाणार आहे. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी याबाबत पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांना पत्र पाठवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाणामुळे विद्यापीठ परिसरात विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाला होता. राजकीय पक्षही त्यामध्ये उतरले होते. त्यानंतर प्रशासनाने सभासद नोंदणीसाठी परवानगी दिली जाणार नसल्याचे जाहीर केले, या संदर्भातील परिपत्रकलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी प्रसिद्ध केले होते.
आगामी हिवाळी सत्र परीक्षांसाठी विद्यापीठाकडून परीक्षा केंद्रावर बाह्य वरिष्ठ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. बाह्य वरिष्ठ पर्यवेक्षक, उड्डाण पथके आणि दक्षता पथक सदस्य म्हणून नियुक्तीसाठी महाविद्यालयांकडून शिक्षकांची नावे मागविली आहेत. मात्र, विद्यापीठाने नियुक्त केलेले अनेक बाह्य वरिष्ठ निरीक्षक त्यांना नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रांवर हजर राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. काकडे म्हणाले, "विद्यापीठ कायद्यातील तरतुदींनुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांनी परीक्षेच्या संदर्भात त्यांना नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्यापीठाने बाह्य पर्यवेक्षक आणि दक्षता पथक सदस्य म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना त्यांच्या संबंधित जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांनाही सुरक्षा व्यवस्थेबाबत पत्र देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा १०० परीक्षा केंद्रांवर घेतल्या जातात. केंद्रांना आवश्यकतेनुसार पोलीसांनी सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.
Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update