बेवासर वाहनांची डोली उठली, आतापर्यंत १३९ वाहने जप्त
पुणे शहरात रस्त्याच्या कडेला, पादचारी मार्गावर महिनोंमहिने चारचाकी, दुचाकी, तीनचाकी वाहने उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे. अशा वाहनांवर महापालिकेने जप्तीची कारवाईची मोहीम सुरू केली आहे. अशाप्रकारे आत्तापर्यंत १३९ वाहने जप्त केली आहेत. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी माहिती दिली आहे. तसेच नागरिकांनी त्यांची वाहने काढून घ्यावेत असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महानगरपालिका हद्दीत रस्ता, पथ इत्यादी ठिकाणी बंद व बेवारस वाहने, पडीक ना-दुरुस्त वाहने आढळ होत आहेत. सदर वाहने रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीस अडथळा होण्याबरोबरच, वाहने जागेवरून न हलविल्यामुळे कचरा तयार होऊन दुर्गंधी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी रस्त्यावरील बेवारस वाहने उचालनेची कारवाई करणेत आली आहे. रस्तावरील बेवारस वाहनांबाबत नागरिकांच्या देखील तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. त्यामुळे बेवासर वाहने जप्त करण्याची मोहिम महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयामार्फत हाती घेण्यात आली आहे.
कारवाई करून जप्त करण्यात आलेली वाहने रिमुव्हल चार्जेस भरून १ महिन्याचे कालावधीमध्ये सोडवून घेता येणार आहेत. तर रस्त्यांवरील वाहनांवर क्षेत्रिय कार्यालयामार्फत नोटीस लावण्यात येत असून याकरिता ७ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. संबंधित वाहनधारकांनी ७ दिवसांच्या मुदतीत वाहन काढून न घेतल्यास सदर वाहनावर पुणे महानगरपालिकेकडून जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिके मार्फत १३९ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. अशा बेवारस व ना-दुरुस्त वाहनांकरिता पुणे महानगरपालिकेच्या मार्फत ९६८९९३१९०० या व्हॉटसप नंबर वर फोटो व लोकेशनसह तक्रारी पाठविण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.