वाहतूक व्यवस्थेसाठी मल्टिमोडल हब; पीएमआरडीएकडून पीपीपी तत्त्वावर विकास करण्याचे नियोजन

जिल्ह्यातील वाहतूक कोंडी समवेत रस्त्याचे प्रश्न सुटावेत, यासाठी पीएमआरडीएच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये एकूण १३ मल्टिमोडल हब आरक्षित आहेत. त्यापैकी प्राधान्याने ५ मल्टिमोडल हब विकसित करण्यासाठी पीएमआरडीएच्या सभेत नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 4 Oct 2024
  • 07:48 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

एकाच ठिकाणी मिळणार सार्वजनिक वाहतूक सेवा

जिल्ह्यातील वाहतूक कोंडी समवेत रस्त्याचे प्रश्न सुटावेत, यासाठी पीएमआरडीएच्या प्रारूप विकास आराखड्यामध्ये एकूण १३ मल्टिमोडल हब आरक्षित आहेत. त्यापैकी प्राधान्याने ५ मल्टिमोडल हब विकसित करण्यासाठी पीएमआरडीएच्या सभेत नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी वाहतुकीचे विविध पर्याय उपलब्ध होऊ शकणार आहेत, अशी माहिती अभियांत्रिकी विभागाच्या वतीने देण्यात आली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) ८३ किलोमीटर अंतरामध्ये अंतर्गत रिंगरोड (इनर रिंगरोड) विकसित करण्यात येत आहे. या रस्त्यावर पीएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यात ५ ठिकाणी मल्टिमोडल हब विकसित करण्यात येणार आहेत. नुकत्याच झालेल्या प्राधिकरणाच्या सभेत हा निर्णय झालेला आहे.  रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यातील कामांतर्गत निरगुडी ते वडगाव शिंदे या अंतरातील रस्त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. सोळू ते निरगुडीदरम्यान होणाऱ्या रस्त्याच्या विस्तृत प्रकल्प अहवालाची छाननी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पुणे) यांच्या वतीने छाननी सुरू आहे. याबाबतच्या तांत्रिक तपासणीनंतर तो पुन्हा प्राधिकरणाकडे देण्यात येईल. त्यानंतर अंतिम सादर केला जाईल.

मेट्रो, बस, रेल्वे आदी वाहतुकीचे विविध पर्याय तसेच ट्रक टर्मिनस, पार्किंग लॉट, पेट्रोल पंप आदी सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत. परिणामी, रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. त्यातच जिल्ह्याच्या विकासाला यामुळे हातभार लागू शकतो. सध्या सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध नसल्याने खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. परिणामी, वाहतूक नियंत्रणावर देखील मोठ्या प्रमाणावर ताण येतो. नागरिकांना शहरांतर्गत आणि शहराबाहेर प्रवास करणे सोपे होणार आहे. रस्ता उभारणी आचारसंहितेनंतर होणार असल्याची चिन्हे आहेत. तूर्तास, रिंगरोडसाठी भूसंपादनाचे काम सध्या सुरू असले तरी प्रत्यक्ष रस्ता उभारणीला मात्र विधानसभा निवडणूक आचारसंहितेनंतरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. या रस्त्यासाठी सोळू, निरगुडी आणि वडगाव शिंदे येथे ३७.५ हेक्टर इतकी जागा संपादित केली जात असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

कोठे होणार मल्टिमोडल हब ?
सोळू, वाघोली, कदमवाक वस्ती, भिल्लारेवाडी आणि भूगाव अशा पाच ठिकाणी मल्टिमोडल हब विकसित केले जाणार आहेत. या हबसाठी आवश्यक भूसंपादन आणि बांधकामासाठी एकूण ३७० कोटी १३ लाख रुपये इतका खर्च होणार असल्याचे अभियांत्रिकी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest