पुणे : कुटुंबियांची वर्णी अन् हजारो कोटींच्या मालमत्तेसाठी अट्टाहास

देशभरात तब्बल १० राज्यांमध्ये मोक्याच्या ठिकाणी सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी (एसआयएस) अंतर्गत कै. महादेव गोविंद रानडे चॅरिटेबल ट्रस्टच्या शेकडो एकर जमिनी आणि भव्य इमारती आहे.

संग्रहित छायाचित्र

सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या (एसआयएस) १० राज्यांमधील जमिनी आणि इमारती व्यावसायिक वापराच्या नावाखाली विनापरवाना परस्पर विकल्याचे उघड

देशभरात तब्बल १० राज्यांमध्ये मोक्याच्या ठिकाणी सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी (एसआयएस) अंतर्गत कै. महादेव गोविंद रानडे चॅरिटेबल ट्रस्टच्या शेकडो एकर जमिनी आणि भव्य इमारती आहे. सध्या काही स्थावर मालमत्ता भाडेतत्त्वावर तसेच विनावापर  पडून आहेत. त्या बेकायदेशीररित्या व्यावसायिक वापरासाठी विक्री करण्यासंदर्भातील हालचाली सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, एकीकडे घटनेत तरतूद नसतानादेखील सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी संचालक मंडळातील काही पदाधिकारी कुटुंबियांना सदस्य बनविण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स विद्यापीठाचे व्यवस्थापन मंडळावर विश्वासाने नियुक्त केलेल्या पुणेस्थित सुप्रसिद्ध आयटी कंपनीचे मालक आणि नामांकित उद्योजक यासंदर्भात पुढाकार घेऊन प्रशासकीय पातळीवरील जबाबदारी पार पाडत असल्याचे समोर आले आहे.

नाव न छापण्याच्या अटीवर सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीच्या सदस्याने ‘सीविक मिरर’ला माहिती देताना सांगितले की, ‘‘देशभरातील विविध राज्यांमधील मोक्याच्या ठिकाणी शेकडो कोटींची मालमत्ता व्यावसायिक वापरासाठी काढण्यासंदर्भात २०२२ पासून हालचाली सुरू झाल्या आहेत. कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर देशभरातील सर्व मालमत्ताची माहिती घेतली जात आहे. 

त्याचा एकंदर हिशेब करून सोसायटीचे विद्यमान सचिव मिलिंद भगवान देशमुख यांनी त्या जागेचे बदल अर्जात नूतनीकरण केले नाही. त्या जागा परस्पर विकून किंवा खासगी बिल्डरला हाताशी घेऊन त्या जागेचे व्यवसायात रूपांतरण करून करोडे रुपये कमावण्यासाठी नियोजन केले. मुंबई, पुणे, नागपूर येथील जागेची मूल्यांकन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.’’

सचिव मिलिंद भगवान देशमुख यांनी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये रानडे ह्यांना कुलगुरू केले. त्यामध्ये रानडे यांनी दोन नामांकित उद्योजकांना नामनिर्देशित करून इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य केले. कारण संस्थेच्या सर्व मालमत्ता  व्यावसायिक करून त्याचा आर्थिक लाभ हा देशमुख यांच्या कुटुंबाला आणि अजित रानडे यांच्या कुलगुरूपदाला सुरक्षित करण्यासाठी करीत आहे. हे सर्व सुरू असताना आत्मानंद मिश्रा हे वरिष्ठ सदस्य आणि इतर विश्वस्त याला विरोध करीत आहे. मात्र त्यांना संस्थेतून काढून टाकणार असल्याची धमकी अध्यक्ष दामोदर साहू वारंवार देत आहेत. साहू हे देशमुखला आर्थिक व्यवहारासाठी संस्थेच्या कोऱ्या चेकबुकवर सह्या करून देतात. शिवाय देशमुख यांना गोखले इन्स्टिट्यूटकडून पैसे देण्यात यावे, अशी मागणी अजित रानडे कडे करतात. ह्या सर्व घटना खुलेआम सुरू असल्याने त्यावर राज्यसरकार, न्यायपालिका तसेच जनतेने लक्ष घालावे, यासाठी काही सदस्य संघर्ष करत आहेत.

कै. महादेव गोविंद रानडे ट्रस्टच्या सर्व मालमत्तांवर आता विशिष्ट विचारसरणीच्या पदाधिकारी आणि उद्योजकांचा डोळा आहे. त्यामुळे ते या प्रकरणात रानडे आणि देशमुख यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. म्हणून न्यायालयात तारीख पे तारीख अशी वेळकाढू पद्धत अवलंबली जात आहे. रानडे यांना कुलगुरू पदावरून काढले. त्यानंतर तातडीने मला दोन दिवसाचा वेळ द्या अशी मौखिक विनंती रानडे यांनी कुलपती डॉ. बिबेक देबरॉय यांच्याकडे करून लगेच उच्च न्यायालयात कुलगुरूपद निश्चित ठेवण्यासाठी स्थगिती मागितली. याप्रकरणी येत्या ७ ऑक्टोबर २०२४ रोजी सुनावणी होणार आहे. सोसायटीचे सदस्य प्रवीणकुमार राऊत यांनी यासंदर्भात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

कुटुंबियांना सोसायटीमध्ये घुसवण्याचा प्रयत्न

‘सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी’च्या अंतर्गत गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्स ही संस्था  पुण्यात शैक्षणिक क्षेत्रात काम करते. अभिमत विद्यापीठ म्हणून या संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून निधी मिळतो. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन देशमुख यांनी सचिवपदाचा वापर करून स्वतःचा मेहुणा सागर काळे याला संस्थेचे ट्रस्टी केले. नंतर बहीण रश्मी सावंत हिला कायदेशीर सल्लागार केले. मुलगा चिन्मय देशमुख याला संस्थेचे व्यवस्थापक केले. अशाप्रकारे देशमुख यांनी कुटुंबीयांची वर्णी लावली. त्यांना सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीकडून लाखो रुपयांचे मानधन मिळत आहे. यावर आक्षेप येऊ नये म्हणून अध्यक्ष दामोदर साहू यांचा मुलगा शेखर साहू आणि वरिष्ठ सदस्य पी. के. द्विवेदी यांचा नातू प्रतीक द्विवेदी यांना आजीवन सदस्य करण्यासाठी कोरम पूर्ण न करता ठराव मंजूर केला. त्यावर आक्षेप घेत वरिष्ठ सदस्य आत्मानंद मिश्रा यांनी धर्मदाय आयुक्तांकडे कलम ४१ ड  नुसार जुलै २०२३ मध्ये तक्रार दाखल केली. मात्र आत्मानंद मिश्रांवर दबाव आणून ती तक्रार मागे घेण्यासाठी प्रवृत्त केले. तेव्हा वरिष्ठ सदस्य पी. के. द्विवेदी यांनी उत्तर प्रदेश येथील ७३ लाख ४ हजार रुपयांच्या शासकीय किंमतीची जमीन १७ लाख रुपयाला परस्पर विकल्याचे प्रकरण उघडीस आले. त्यावर प्रवीणकुमार राऊत यांनी जानेवारी २०२४ मध्ये धर्मदाय आयुक्त यांच्याकडे त्या जमिनिविक्रीचे प्रकरण दाखल केले. याप्रकरणी पुणे धर्मदाय सहआयुक्तांनी स्वयंप्रेरणेने चौकशी लावली आहे. "

सुत्रांच्या माहितीनुसार, हे प्रकरण दडपण्यासाठी सोसायटीचे सदस्य प्रवीणकुमार राऊत ह्यांचे मानधन बंद करून त्यांना संस्थेतून बाहेर काढण्यासाठी तसेच गणसंख्या पूर्ण नसतानादेखील अध्यक्षांचा मुलगा, सचिवाचा मुलगा तसेच वरिष्ठ सदस्याचा नातू यांना सदस्य केले. घटनेत तरतूद नसतानाही त्यांना मतदानाचे अधिकार देण्यात आले. त्यांचे नाव लगेच बदल अर्जात दाखल केले. मात्र प्रवीणकुमार राऊत हे जुलै २०१५ पासून सदस्य असून तसेच वरिष्ठ सदस्य गंगाधर साहू व रमाकांत लेंका ह्यांचे नावसुध्दा बदल अर्जात टाकले नाही. त्यावरसुद्धा प्रवीणकुमार राऊत ह्यांची हरकत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदवली आहे.

नागपूरची मोक्याची जागा विकण्यासाठी फिल्डिंग

नागपूर येथील दोन मजली इमारत आणि परिसराचा एका नामांकित इंग्रजी दैनिकाचे मुख्य कार्यालय आणि भारतीय टपाल कार्यालयाशी भाडेकरार २०३० पर्यंत आहे. तरीही कुलगुरू रानडे आणि सचिव देशमुख यांनी ती मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी पुणेस्थित नामांकित आयटी कंपनीचे मालक आणि कुलसचिव कर्नल कपील जोध यांना व्यवस्थापन करण्याचे हक्क ठराव घेऊन केले. त्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी वापरण्यात आला. याऐवजी तो विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व इतर शैक्षणिक उपक्रमासाठी उपयोगात आणता आला असता.  मात्र या संस्थेत पूर्णपणे देशमुख आणि त्याचे कुटुंब अधिकार गाजवत आहे. सोसायटीचे दिवंगत सदस्य आर. व्ही. नेवे यांनी नागपूरच्या मालमत्तेसाठी देशमुखला विरोध केला होता. त्यामुळे त्यांचे मानधन बंद करून त्रास दिल्यामुळे त्यांच्यावर मानसिक आघात झाला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीला नागपूरच्या हेडक्वार्टरमध्ये संस्थेचे नियमानुसार राहता येत नसतानादेखील त्याठिकाणी राहत आहेत. देशमुख त्यांना पैसे देऊन नागपूरच्या मालमत्तेबाबत कुणालाही घोटाळे कळू द्यायचे नाही, यासाठी त्यांना मदत करत आहे. अशा अनेक घटना तपासाअंती क्रमाक्रमाने पुढे येतील, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी ‘सीविक मिरर’ला दिली.

स्वातंत्र्यपूर्वकाळातील सुवर्ण इतिहास जपणार की मालमत्ता विकून आर्थिक लाभ घेणार?

सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे शिष्य तसेच महात्मा गांधीजींचे राजकीय गुरू असलेले नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी अखिल भारतीय सामाजिक चळवळीचे नेतृत्व करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतर १२ जून १९०५ मध्ये निर्माण केली. रचनात्मक कामांसाठी देशातील उच्चशिक्षित तरुणांना प्रशिक्षण देऊन आजीवन देशाची सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देणे, या याच्या स्थापनेमागील हेतू होता. याच काळात गोखलेंनी महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात बोलावून घेतले आणि देशाचा प्रत्यक्ष परिचय करून घेण्यासाठी भारतभ्रमण करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी गोखलेंनी गांधींना दिशा दाखविली आणि मार्गदर्शन केले. साबरमती येथील आश्रमासाठीसुद्धा गोखलेंनी सर्वतोपरी सहाय्य केले होते. सर्व्हन्ट्स ऑफ इंडिया सोसायटी, कै. महादेव गोविंद रानडे ट्रस्ट आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्स (अभिमत विद्यापीठ) हा ऐतिहासिक वारसा जपणार की मालमत्तांचे व्यावसायिकीकरण करून कोट्यवधी रुपयांची आर्थिक लूट करणार, असा संतप्त सवाल सोसायटीचे जुने निष्ठावंत सदस्य उपस्थित करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest