मुलीबाळींनी बाहेर पडायचे की नाही? पुण्यात लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे महिला संतप्त

पुण्यात दिवसागणिक महिला आणि अल्पवयीन बालकांवर लैंगिक अत्याचारांच्या घटना उजेडात येऊ लागल्या आहेत. बलात्कार, विनयभंग, सोशल मिडियावरील छेडछाड, महाविद्यालयीन मुलींचा पाठलाग अशा अनेक घटना दररोज घडत आहेत.

sexual assault in Pune

मुलीबाळींनी बाहेर पडायचे की नाही? पुण्यात लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे महिला संतप्त

कोंढव्यातील बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर सामुहिक बलात्कार

पुण्यात दिवसागणिक महिला आणि अल्पवयीन बालकांवर लैंगिक अत्याचारांच्या घटना उजेडात येऊ लागल्या आहेत. बलात्कार, विनयभंग, सोशल मिडियावरील छेडछाड, महाविद्यालयीन मुलींचा पाठलाग अशा अनेक घटना दररोज घडत आहेत. या लैंगिक अत्याचारांमुळे अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्याच्या घटनादेखील वाढीस लागल्या आहेत. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील बारावीच्या मुलीवर तिच्या मित्रांनी केलेला लैंगिक अत्याचार, वानवडी येथे शाळकरी मुलींसोबत स्कूल व्हॅन चालकाने केलेले अश्लील कृत्य, वारजे येथे वडिलांनी मुलीवर वर्षभरापासून केलेला पाशवी बलात्कार या घटना उजेडात आल्या. यापाठोपाठ पुण्याला हादरवून सोडणारी घटना घडली आहे. कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी बलात्कार केला. मित्राचे हातपाय बांधून ठेवत तिच्यावर अत्याचार करण्यात आले. एकापाठोपाठ घडत असलेल्या अत्याचाराच्या या घटनांमुळे मुलीबाळींनी घराबाहेर पडायचे की नाही, असा संतप्त सवाल महिला विचारू लागल्या आहेत.

पीडित तरुणी मूळची परराज्यातील आहे. ती सूरत येथील राहणारी आहे. तर, तिचा मित्र जळगावमधील आहे. पिडीत मुलगी २१ वर्षांची असून ती शिक्षणानिमित्त पुण्यात आलेली आहे. तर मुलाने ‘सीए’चे शिक्षण पूर्ण केलेले आहे. तो सध्या एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याच ठिकाणी पिडीत मुलीची बहीणदेखील नोकरी करते. तिच्या मार्फतच या दोघांची ओळख झाली होती. गुरुवारी (दि. ३) संध्याकाळी हा तरुण तिच्या सहकारी तरुणीसह एका क्लायंटकडे गेला होता. तेथून परत येत असताना त्याला पिडीत मुलीचा फोन आला. त्यानंतर हे दोघे भेटले. तेथून तिच्याच दुचाकीवर हे दोघे बोपदेव घाटात आले. या मुलीला घाटामधून पुणे शहर रात्री कसे दिसते हे पहायचे होते. त्याकरिता हे दोघेही घाटामध्ये आले होते. रात्री अकराच्या सुमारास तरुणी अणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तीन आरोपींनी तरुणीच्या मित्राने आरडाओरडा करू नये, म्हणून   त्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचा शर्ट आरोपींनी काढला. शर्टाने त्याचे हातपाय बांधले. त्यानंतर त्याच्या पॅन्टचा बेल्ट काढला. त्या बेल्टने त्याचे पाय बांधले. त्यानंतर त्याला एका झाडाला बांधले. यानंतर आरोपींनी तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला.

यावेळी तरुणीला मारहाणदेखील करण्यात आली. त्यानंतर, आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. तरुणीने कसेबसे स्वत:ला सावरत मित्राची सुटका केली. मित्राने, तरुणीला धीर दिला. त्याने तिला ससूनरुग्णालयात दाखल केल्यानंतर शुक्रवारी (दि. ४) हा प्रकार पोलिसांना समजला. ससूनमध्ये प्राथमिक तपासणी करून पीडितेवर उपचार सुरू करण्यात आले. आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेची आणि कोंढवा पोलिसांची मिळून एकूण दहा पथके रवाना करण्यात आली आहेत.

तीन दिवसांपूर्वी याच घाटात तरुणीचा विनयभंग

तीन दिवसांपूर्वी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीचे मोटारीतून अपहरण करून तिचा विनयभंग करण्यात आला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी कारचालक राजेखाँ करीम पठाण (वय ३६, रा. कोंढवा) याला अटक केली. पिडीत तरुणीने यासंबंधी फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली होती. मोटारीतून आलेल्या पठाणने मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी केली. या ठिकाणी जोडप्यांना बंदी असल्याचे सांगत दोघांची छायाचित्रे काढली. तरुणीला धमकावत कारमध्ये बसवले. कार खडी मशीन चौकात मधील एका बोळात उभी करून तिचा विनयभंग केला. यानंतर तिला चौकात सोडून आरोपी पसार झाला होता.

आरोपींची रेखाचित्रे जाहीर, नागरिकांना आवाहन

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपींची रेखाचित्रे पोलिसांनी जाहीर केली आहेत. या वर्णनाचे आरोपी आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या ८६९१९९९६८९ या क्रमांकावर तसेच, गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या ८२७५२००९४७ / ९३०७५४५०४५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या ०२० - २६१२२८८० या क्रमांकावरदेखील संपर्क साधून माहिती देता येणार आहे. 

बोपदेव घाटात परिसरात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास मित्राबरोबर फिरायला आलेल्या तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची घटना घडली. तरुणीच्या मित्राने तिला रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर या घटनेची माहिती शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बलात्कार करुन पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दहा पथके तयार केली आहेत.

- रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त, पुणे

बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत. या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

- सुप्रिया सुळे, खासदार

पुण्यातील बोपदेव घाट येथे २१ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्काराची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे पोलीस तसेच क्राईम ब्रांच अशी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून आरोपींचे स्केच तयार करण्यात आले आहे. युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. या लिंगपिसाट हरामखोर नराधमांना पोलीस पाताळातूनसुद्धा शोधून काढतील आणि त्यांना कठोरात कठोर  शिक्षा होईल, याची मला खात्री आहे.

- चित्रा वाघ, अध्यक्षा, भाजपा महिला मोर्चा

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest