संग्रहित छायाचित्र
पुणे: मागील काही महिन्यांत शहरातील शास्त्री रस्ता पुणे येथे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या काही मागण्या मंजूर झाल्या होत्या परंतु काही मागण्या अजुनही प्रलंबित होत्या. या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका असून आचारसंहिता लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जाहिरातीसंदर्भात अडचण निर्माण होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी त्याआधीच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. शास्त्री रोडवरील मागील आंदोलनाचा अनुभव पाहता पोलिसांनी शास्त्री रोड, अलका टॉकीज चौक, बालगंधर्व चौक येथे आंदोलनास परवानगी नाकारली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व विद्यार्थ्यांचा राजकीय वापर होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या सूचना मान्य केल्या. तसेच प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मोजक्याच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान हे आंदोलन अराजकीय असल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला.
दरम्यान, या आंदोलनाची तात्काळ दखल घेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis,) यांनी समाज माध्यमातून अराजपत्रित गट - ब, गट - क संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात येत्या काही दिवसांत काढण्यासंदर्भात एमपीएससीच्या आयोगाच्या अध्यक्षांशी चर्चा झाल्याचे सांगितले. फडणवीस यांनी आंदोलनाची तात्काळ दखल घेत आश्वासन दिल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. त्यानंतर विद्यार्थ्यानी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र येत्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मोठ्या संख्येने एकत्र जमून पुण्यातील शास्त्री रस्त्यावर मोठे आंदोलन केले जाईल असा निर्णय आंदोलन स्थगित करण्याआधी विद्यार्थ्यांनी घेतला.
आंदोलनातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या :
१) एमपीएससी संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क २०२४ परीक्षेची जास्तीत जास्त जागांची जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी.
२) एमपीएससी महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा २०२४ ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची होणारी शेवटची परीक्षा आहे. त्यामुळे या परीक्षेतून भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या जास्तीत जास्त असावी. यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार अशा महत्वाच्या सर्व ३५ संवर्गाच्या पदांचा समावेश असावा.
३) जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) प्रलंबित जाहिरात लवकरात लवकर यावी.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
शासन सेवेतील 'गट ब आणि क' पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती. आज एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून यासंदर्भात विनंती केली. त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आम्ही आंदोलन केले. संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क परीक्षेची जाहिरात, राज्यसेवा परीक्षेमधील पदांची वाढ, जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) जाहिरात या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून संयुक्त अराजपत्रित गट ब व गट क परीक्षेची जाहिरात येत्या काही दिवसात काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आम्ही आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. परंतु येत्या काळात आमच्या सर्व मागण्या जर मंजूर झाल्या नाहीत तर आम्ही पुन्हा एकदा शास्त्री रोड, पुणे येथे आंदोलन करण्यावर ठाम आहोत.
- नितीन आंधळे, आंदोलन आयोजक स्पर्धा परीक्षार्थी
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.