वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीचीच संधी महत्वाची; ४११५ ग्राहकांना सध्या नकोय नवीन वीजजोडणी

पुणे: थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या जागेवर व्याज व विलंब आकारासह वीजबिलांची थकबाकी वाढतच जाणार आहे. जागेची मालकी बदलली तरी वीजबिलांची थकबाकी भरावीच लागणार.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 4 Oct 2024
  • 06:15 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे: थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या जागेवर व्याज व विलंब आकारासह वीजबिलांची थकबाकी वाढतच जाणार आहे. जागेची मालकी बदलली तरी वीजबिलांची थकबाकी भरावीच लागणार. त्यामुळे सध्याच्या वीजबिल थकबाकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी संपूर्ण व्याज व विलंब आकार शुल्काची माफी असलेल्या महावितरण अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. थकबाकी असलेल्या जागेवर सध्या विजेची गरज नसली तरी अभय योजनेचा फायदा घेत वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीला प्राधान्य देत ४ हजार ११४ ग्राहकांनी नवीन वीजजोडणीची मागणी नसल्याचे अर्जात नमूद केले आहे. तर उर्वरित ५ हजार ५८३ ग्राहकांनी मात्र नवीन वीजजोडणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालक किंवा ताबेदार यांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल असा निकाल मा. सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. थकबाकी असलेल्या जागेवर पुन्हा वीजपुरवठा पाहिजे असल्यास एरवी सर्वप्रथम संपूर्ण थकबाकीची रक्कम भरणे आवश्यक असते. मात्र आता दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या जागा वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने अभय योजनेतून विशेष संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेनुसार एकूण थकीत रकमेतील व्याज व विलंब आकाराची संपूर्ण १०० टक्के रक्कम माफ होणार आहे व केवळ मूळ थकबाकीचाच भरणा करावा लागणार आहे.

कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही अभय योजना आहे. विशेष म्हणजे केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळत आहे. किंवा मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. सोबतच मागणीनुसार नवीन वीजजोडणी घेण्याची सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या फ्रेंचायझी क्षेत्रातील ग्राहकांना देखील ही संधी आहे. ही योजना दि. १ सप्टेंबर ते दि. ३० नोव्हेंबरपर्यंत असल्याने थकबाकीमुक्तीच्या या योजनेचे केवळ ५७ दिवस शिल्लक आहेत.

कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या जागेवर वीजबिलांची जुनी थकबाकी भविष्यात विजेच्या वापरासाठी नियमानुसार भरावीच लागणार आहे. त्यामुळे सध्या वीज वापराची गरज असो किंवा नसो, थकबाकीदार ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घेऊन किमान वीजबिलाच्या सध्याच्या थकबाकीतून मुक्त् व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ९ हजार ६९८ ग्राहकांनी अभय योजनेत सहभाग नोंदविला आहे. यात पुणे जिल्हा- ४६१७, सातारा- ४५५, सोलापूर- १४३९, कोल्हापूर- ११०२ आणि सांगली जिल्ह्यातील २०८५ थकबाकीदारांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. या ग्राहकांनी मूळ थकबाकी भरल्यास व्याज व विलंब आकार शुल्काचे संपूर्ण ३ कोटी २४ लाख रुपये माफ होणार आहे. योजनेत सहभागी ४ हजार ११५ वीजग्राहकांनी केवळ जागेच्या थकबाकीमुक्तीला प्राधान्य देत नवीन वीजजोडणीची आवश्यकता नसल्याचे नमूद केले आहे. तर उर्वरित ५ हजार ५८३ ग्राहकांनी नवीन वीजजोडणी घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे सहभागी ९ हजार ३१६ (९६ टक्के) ग्राहकांनी थकबाकी एकरकमी भरण्यास पसंती दिल्याने त्यांना मूळ थकबाकीमध्ये आणखी सवलत मिळणार आहे. 

महावितरण अभय योजनेत सहभागी होण्यासाठी व थकबाकीची रक्कम भरण्याची सोय www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest