पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकामांवर गुन्हे दाखल!

पुणे: जिल्ह्यातील वाढते अतिक्रमण प्रशासनाची डोकेदुखी ठरवू लागली आहे. त्यामुळे आता कारवाईसोबतच गुन्हे दाखल करण्याची पावले उचलण्यात आली आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) नुकतेच या प्रकरणी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 4 Oct 2024
  • 06:57 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकामांवर गुन्हे दाखल!

नोटीस पाठवूनही घेतली नाही दखल, दोन ठिकाणी नोंदवले गुन्हे

पुणे: जिल्ह्यातील वाढते अतिक्रमण प्रशासनाची डोकेदुखी ठरवू लागली आहे. त्यामुळे आता कारवाईसोबतच गुन्हे दाखल करण्याची पावले उचलण्यात आली आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) नुकतेच या प्रकरणी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. नोटीसकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी दोघांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त योगेश म्हसे यांनी दिली.

हिंजवडी आण‍ि मांजरी भागातील अनधिकृत बांधकामधारकावर गुन्हे नोंदव‍ण्यात आले आहे. तत्पूर्वी संबंध‍ितांना अनधिकृत बांधकाम थांबव‍ण्याबाबत नोटीस बजावली होती. पण त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानुसार हिंजवडी येथील स.नं. २५८ या ठिकाणी श्रीकांत भानुदास नवले (रा. हिंजवडी ता. मुळशी) यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस स्टेशन तर मांजरी येथील सर्व्हे नं.१५३ येथील अनधिकृत बांधकाम करणारे दीपाली विजय भाडाळे (रा. हडपसर,पुणे) यांच्याविरुध्द हडपसर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ कलम ५४ (२) अन्वये ही कारवाई केली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील मालमत्ताधारकांनी परवानगी घेऊनच आपली बांधकामे करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे. यासह सुरू असलेली अनधिकृत बांधकामे तत्काळ थांबवावीत. अन्यथा संबंध‍ितांवर उक्त नियमाप्रमाणे कारवाई करणार असल्याचे पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी स्पष्ट केले. पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन मस्के, रवींद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता गणेश जाधव, विष्णुदास आवाड यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

पहिल्यांदाच गुन्हा दाखल करण्याचा निर्णय
हिंजवडी व मांजरी येथील अनधिकृत बांधकामधारक अनुक्रमे श्रीकांत नवले आण‍ि दीपाली भाडाळे यांचेवर पहिल्यांदाच या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५४ नुसार अनधिकृत बांधकामधारकास अनधिकृत बांधकाम थांबवण्याची  दिल्यानंतर संबंधित बांधकाम न थांबवल्यास तीन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा पाच हजार रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest