अनवट रागांनी रंगले सवाई'च्या अखेरच्या दिवशीचे पहिले सत्र

पं. श्रीनिवास जोशी आणि पौर्णिमा धुमाळे, पं. सुहास व्यास आणि डॉ. ऐश्वर्या वेंकटरमण यांचे प्रत्ययकारी सादरीकरण

SawaiGandharvaBhimsenfestival

अनवट रागांनी रंगले सवाई'च्या अखेरच्या दिवशीचे पहिले सत्र

पुणे, दि. १७ डिसेंबर २०२३ : आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून महोत्सवाची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या श्रीनिवास जोशी यांचे प्रत्ययकारी गायन तसेच ज्येष्ठ गायिका पौर्णिमा धुमाळे यांच्याकडून अनवट रागांची मिळालेली अत्यंत सुरेल मेजवानी, हे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या पहिल्या सत्राचे वेगळेपण ठरले. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात अखेरच्या दिवशी रसिकांची उच्चाकी गर्दी होती. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी सुरवातीला प्रसिद्ध गायक, पं.‌ भीमसेन जोशी यांचे सुपुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी यांनी आपली गायनसेवा रुजू केली. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि शिष्य विराज जोशी सहगायनासाठी होते. प्रारंभी रसिकांशी संवाद साधताना ते म्हणाले, “आज वेगळी संकल्पना घेऊन गाणार आहे. बाबा (भीमसेनजी) किराणा घराण्याचे होते, पण त्यांनी काही वेळा किराणा घराण्यात नेहमी गायिले न जाणारे रागही गायिले. तसेच अन्य घराण्यातील आवडलेल्या रचनाही गायिल्या. अशा काही रचना सादर करणार आहे आणि हीच आजच्या सादरीकरणाची संकल्पना आहे.”

श्रीनिवास जोशी यांनी शुद्ध सारंग रागात पं. शिवरामबुवा वझे यांच्याकडून ऐकलेली 'सुंदर कांचन' ही रचना आणि त्याला जोडून उस्ताद फैय्याज खाँ यांची बंदिश सादर केली. त्यांच्या गायनातून रसिकांना ग्वाल्हेर, आग्रा अशा घराण्यातील रचनांचा आनंद मिळाला. त्यानंतर 'प्रेम सेवा शरण' हे मानापमान नाटकातील पद त्यांनी ऐकवले. हे पद उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब गात असत, असे श्रीनिवास जोशी म्हणाले. अमृतसिद्धी नाटकातील मा. कृष्णराव यांचे संगीत असलेले आणि बालगंधर्व यांनी अजरामर केलेले 'तुमबिन मोरे कौन' हे मीराभजन त्यांनी ऐकवले. त्यांना अविनाश दिघे (हार्मोनियम), पांडुरंग पवार (तबला), नीता दीक्षित व वैशाली कुबेर (तानपुरा) यांनी पूरक साथसंगत केली.

त्यानंतर आग्रा घराण्याची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या ज्येष्ठ गायिका पौर्णिमा धुमाळे यांचे स्वरमंचावर आगमन झाले. सवाईच्या स्वरमंचावर पौर्णिमाताईंनी प्रथमच गायन सादर केले. आग्रा घराण्याचा ठसा उमटलेल्या 'बरवा' रागातील नोमतोम मधून त्यांनी सुरेल वातावरण निर्मिती केली. त्यांच्या गुरूमाता उषाताई हळदणकर तसेच द्वितीय गुरू पं. विवेक जोशी यावेळी आवर्जून उपस्थित होते. पौर्णिमाताईंनी मध्यलय एकतालातील बंदिश सविस्तर मांडून उस्ताद खादीम हुसेन खाँ उर्फ 'सजनपिया" रचित 'आयो है सावनमास' ही बंदिश अतिशय ढंगदारपणे सादर केली. त्यानंतर 'खट' रागात पं. रातंजनकर रचित 'बॅंधा समा' ही बंदिश अप्रतिम पद्धतीने त्यांनी पेश केली. खमाज रागातील 'ना मानूंगी ' ही बंदिश की ठुमरी सादर करून त्यांनी विराम घेतला. त्यांना संजय देशपांडे (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) तसेच गौरी पाटील व कीर्ती कस्तुरे यांनी तानपुरा साथ केली.

सवाईचे दुपारचे सत्रही सहसा ऐकायला न मिळणाऱ्या मध्यान्हसमय रागांनी श्रवणीय झाले. ज्येष्ठ गायक पं. सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे सुपुत्र आणि शिष्य पं. सुहास व्यास यांचे गायन दुपारी तीनच्या सुमारास झाले. त्यांनी राग 'धानी' मधील पं. सी. आर. व्यास यांची 'सब मिल गावे ' ही बंदिश मांडली. त्याला जोडून 'ओ मनवा, तू मन जाने' ही रचनाही गायिली. त्यानंतर राग श्री मधील झपतालातील 'अरज मोरी सुन ले' ही बंदिश, आणि 'सांज की बेल' या रचना सादर करून संत चोखोबांच्या 'जोहार मायबाप' या भक्तीरचनेने त्यांनी समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला), श्रीनिवास आचार्य (हार्मोनियम), आदित्य व्यास (स्वरसाथ),  ज्ञानराज माऊली अवसेकर व केदार केळकर यांनी तानपुरा साथ केली.

त्यानंतर सादर झालेल्या कर्नाटक संगीतावर आधारित समूह वादनाने स्वरमंडपात वेगळाच माहोल निर्माण झाला. प्रतिभासंपन्न कलावती डॉ. ऐश्वर्या वेंकटरमण (व्हायोलिन), विनोद वेंकटरमण (मृदंगम), पाॅल लिव्हिंगस्टोन (गिटार), रे बिलाय (ड्रमसेट), ए. व्ही.‌कृष्णन (घटम) या कलाकारांनी एकत्रितपणे सादर केलेल्या 'आत्मा' या समूहवादनाने स्वरमंडपात टाळ्यांचा कडकडाट सातत्याने सुरू राहिला. त्यांच्या प्रत्येक कृती आणि आवर्तनाला रसिकांनी दाद दिली.

जगभरातील कोविडग्रस्तांप्रती सह अनुभूती दर्शवणारी १९ मात्रांमध्ये निबद्ध असलेली 'पल्लवी' भरभरून प्रतिसाद मिळवणारी ठरली. सुरवातीला डॉ. ऐश्वर्या यांनी एकल वादनही सादर केले. प्रत्येक वादक कलाकारांची स्वतंत्रपणे एकल प्रस्तुतीदेखिल रसिकांनी वाखाणली. शेवटी रसिकांच्या आग्रहाला मान देत कलाकारांच्या या चमूने शंराभरणम मध्ये रचना पेश करत सांगता केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest