नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढणार!

पुणे: विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या वाढत्या ओझ्यावरून कायमच प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणाऱ्या दप्तराचे ओझे कसे कमी होणार, याबाबत अनेकदा चर्चा करण्यात आली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

अभ्यासक्रमात मोठा बदल; अभ्यासक्रमात तीन विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश

पुणे: विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या वाढत्या ओझ्यावरून कायमच प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणाऱ्या दप्तराचे ओझे कसे कमी होणार, याबाबत अनेकदा चर्चा करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या ओझ्याचा प्रश्न अद्याप अनुत्तरित असताना आता तो कमी होण्याऐवजी आणखी वाढणार आहे. कारण नववी, दहावी अभ्यासक्रमाच्या सात विषयांत अतिरिक्त तीन विषयांची भर पडणार आहे. शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकाम या नव्या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

पालक, विद्यार्थी संघटनांसह स्वयंसेवी संस्थांच्या सर्वेक्षणातून अवजड दप्तरामुळे पाठदुखी, मणक्याचे गंभीर आजार असे निष्कर्ष समोर आले होते. या संदर्भात राज्य सरकारच्या दरबारीसुद्धा हा प्रश्न मांडण्यात आला. पण अद्याप तरी या प्रश्नावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. परंतु, आता विद्यार्थ्यांचे पाठीवरील ओझे कमी नाही तर वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण लवकरच नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार असून यामुळे विद्यार्थ्यांना अधिकचा अभ्यास करावा लागणार आहे.

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना सध्या तरी सात ते आठ विषयांचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषा आणि त्या व्यतिरिक्त विज्ञान, गणित, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, शारीरिक शिक्षण इत्यादी विषय आहेत. पण आता यामध्ये व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण, अंतर्गत विद्या शाखा विषय यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याशिवाय स्काउट गाइडसुद्धा बंधनकारक असणार आहे. ज्यामुळे तब्बल १४ ते १५ विषय विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ्यासोबतच अभ्यासाचे ओझेदेखील वाढणार आहे. या व्यतिरिक्त विषयांमुळे शाळांच्या वेळाही वाढवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर याबाबतची ब्लू प्रिंट देण्यात आली आहे.

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्यात येणार असून त्यानुसार, व्यावसायिक शिक्षणामध्ये नववीसाठी विद्यार्थ्यांना शेती, नळ दुरुस्ती, सौंदर्य या व्यवसायांची ओळख करून देण्यात येईल. दहावीला बागकाम, सुतारकाम, परिचर्या या व्यवसायांची ओळख करून देण्यात येईल. कलाशिक्षणात दृश्यकला, नाट्य, संगीत, नृत्य, लोककला या सर्वांची ओळख करून देण्यात येईल. या विषयाला श्रेणी देण्यात येईल. सादरीकरण, शिक्षकांचे निरीक्षण, विद्यार्थ्यांचे स्वयंमूल्यमापन, गटकामगिरी, कल्पकता याआधारे मूल्यमापन करण्यात येईल. हा बदल करताना भारतीय भाषांची सक्ती करण्यात आली आहे. तसेच मुख्य विषयांचा ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, याबाबत विचार केला गेला आहे. आता या संदर्भात शाळांकडून सूचना आल्यानंतर त्याचा अभ्यास करून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.

काय होणार?
- नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय भाषांचा समावेश सक्तीचा केला आहे. शाळांकडून सूचना आल्यानंतरच अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे.

- व्यावसायिक शिक्षणामध्ये नववीसाठी विद्यार्थ्यांना शेती, नळ दुरुस्ती, सौंदर्य या व्यवसायांची ओळख करून देण्यात येणार आहे.

- दहावीला बागकाम, सुतारकाम परिचय यासारख्या व्यवसायांची माहिती देण्यात आली आहे.

- कला शिक्षणातून दृश्यकला, नाट्य, संगीत, नृत्य, लोककला हे विषय शिकवण्यात येणार आहेत.

नवीन कौशल्याधारित विषयांचा समावेश केला या निर्णयाचे स्वागत करतो. परंतु विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कसे कमी होणार, याचा गांभीर्याने कधी विचार होणार आहे? त्यासाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार आहे? विविध सर्वेक्षणातून विद्यार्थ्यांना पाठदुखी, मान आणि मणक्याच्या आजारांसह बौद्धिक ताणतणाव असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यावर उपाय म्हणून दप्तरांचे ओझे कमी करण्याची शिफारस करण्यात आली होती. शाळेत स्वतंत्र कपाटात जुनी पुस्तके, घरी नवीन पुस्तके असे उपाय दिले होते. परंतु त्यावर कुठलाही धोरणात्मक निर्णय घेतला नाही.
- हेरंब कुलकर्णी, शिक्षक प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकास करण्यासाठी आवश्यक ते बदल करण्याऐवजी मागणी नसताना शेती, नळ दुरुस्ती, सौंदर्य या व्यवसायांचा विषय अभ्यासक्रमात दिला आहे. त्यामुळे विनाकारण पाठीवरील ओझे वाढविले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी विविध उपाय सुचविले आहेत. त्यापैकी एकही उपाय अमलात आणला नाही.
- आनंद रणधीर, पालक प्रतिनिधी आणि संस्थापक-अध्यक्ष, सम्यक फाउंडेशन महाराष्ट्र

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest