जुनं ते सोनं... पण ठेकेदारासाठी! मनोरुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या पाडकामाच्या बदल्यात ठेकेदाराला दिले कोट्यवधींचे सागवान लाकूड, लोखंड, घडीव दगड

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या पाडकामाच्या बदल्यात चक्क शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वीचे सागवान लाकूड, लोखंड आणि घडीव दगड देण्याचा ‘वस्तुविनिमय’ पद्धत (बार्टर सिस्टीम) दिसून आली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

मनोरुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या पाडकामाच्या बदल्यात ठेकेदाराला दिले कोट्यवधींचे सागवान लाकूड, लोखंड, घडीव दगड

पुणे: जुन्या गोष्टींचे मूल्य अधोरेखित करणारी 'जुनं ते सोनं' ही म्हण आपणा सर्वांना माहिती आहे.  येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या पाडकामाचा मोबदला म्हणून तेथील जुन्या सागवान लाकडासह कोट्यवधी रुपयांच्या अनेक वस्तू बार्टर पद्धतीने ठेकेदाराला देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) ठेकेदार कसे हुशार असतात, याचा प्रत्यय यानिमित्ताने आला. येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या पाडकामाच्या बदल्यात चक्क शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वीचे सागवान लाकूड, लोखंड आणि घडीव दगड देण्याचा ‘वस्तुविनिमय’ पद्धत (बार्टर सिस्टीम) दिसून आली. ‘‘संबंधित ठेकेदारानेच हे जुने सागवान लाकूड आणि इतर वस्तू कामाचा मोबदला म्हणून मिळावा, यासाठी प्रयत्न केले होते. शिवाय पीडब्ल्यूडीतील अधिकाऱ्यांनाही त्यांचा ‘मोबदला’ मिळणार असल्याने याला संमती देण्यात आली,’’ अशी चर्चा जोरात आहे. या बार्टरमुळे संबंधित ठेकेदार मालामाल झाला आहे.

बाजारभावाप्रमाणे सागवान लाकूड प्रतिघनफूट सहा ते नऊ हजार रुपये, लोखंड तीस ते चाळीस रुपये किलो तर घडीव एका दगडाची किंमत पाचशे ते सहाशे रुपये आहे.  येरवडा मनोरुग्णालयाच्या जुन्या बांधकामातून शेकडो घनफूट सागवान लाकूड, काही टन लोखंड तर हजारो घडीव दगड संबंधित ठेकेदाराला मिळाले.

त्यामुळे या सर्व वस्तूंची किंमत बाजारभावाप्रमाणे काही कोटी रुपये होतात. हा फायदा ठेकेदाराला मिळवून देण्यासाठी संबंधित पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांनी कशी युक्ती केली आहे, हे यानिमित्ताने दिसून आले.

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील जुन्या इमारती पाडून त्या जागी नवीन इमारती बांधल्या जात आहेत. या इमारतीच्या पाडकामाचा ठेका नाशिक येथील एका ठेकेदाराला मिळाला आहे. मात्र, पाडकामाचा ठेका देताना ठेकेदाराला पैशांचा मोबदला न देता त्यांना पाडकामातील जुने सागवान लाकूड, लोखंड, तुळई, घडीव दगड देण्याची  बार्टर सिस्टीम (वस्तुविनिमय पद्धत) पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि ठेकेदारांनी अमलात आणली. त्यामुळे शंभर वर्षांपेक्षा जास्त जुन्या इमारती पाडल्यानंतर त्यातून जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे निघालेला भंगार माल पाहून येथील कर्मचाऱ्यांचे डोळे पांढरे व्हायची वेळी आली. कारण जुने सागवान लाकूड, लोखंड आणि घडीव दगडाला आजही चांगली किंमत मिळते.  हे सैनिकांसाठीचे रुग्णालय होते. या ठिकाणी रुग्णालय कक्षासह पन्नास ते साठ लहान व मोठ्या इमारती आहेत. या इमारतीच्या बांधकामात जास्तीत जास्त लाकूड व लोखंडाचा वापर केला गेला आहे.  खिडक्या व दरवाजासाठी वापरलेले सागवान लाकूड, लोखंड चांगल्या दर्जाचे होते. त्यामुळे खिडक्या व दरवाजे मजबूत स्थितीत आजही आहेत. छतावरील पत्रे आजही सुस्थितीत आहेत.    

येरवडा मनोरुग्णालयाच्या जुन्या इमारतींमधून मिळालेल्या जुन्या सागवान लाकडातून टेबल , खुर्च्या, अनेक शोभेच्या वस्तू बनविता आल्या असत्या. या वस्तूंची विक्री करता आली असती. यातून बरे झालेल्या मनोरुग्णांच्या पुनर्वसन प्रकल्पात उपयोग झाला असता, असे काही समाजसेवकांचे मत आहे. त्यामुळे किमान पुढील जुन्या इमारती पाडल्यानंतर त्यातून मिळणारे लाकूड, लोखंड मनोरुग्णालयाच्या ताब्यात ठेवण्याची तयारी मनोरुग्णालय प्रशासन करीत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले संमतीचे पत्र

सुरुवातीला येरवडा मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुनील पाटील यांनी संबंधित ठेकेदाराला भंगारमाल घेऊन जाऊ दिले नाही. मात्र, संबंधित ठेकेदाराला जुन्या इमारतीच्या पाडकामाच्या बदल्यात जुने सागवान लाकूड, लोखंड आणि घडीव दगड देणार असल्याचे निविदेमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे ठेकेदाराला ते घेऊन जाऊ द्या, असे लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. सु. र. काटकर यांनी डॉ. पाटील यांना दिले. त्यानंतर ठेकेदार येथील काही ट्रक सागवान लाकूड, लोखंड आणि घडीव दगड घेऊन गेला. अजूनही पाडकाम सुरू असून उर्वरित कामातील सागवान लाकडासह इतर वस्तूही ठेकेदार नेणार आहे.

कारागृहातील सुतार विभागाला लाकूड दिले असते तर झाला असता फायदा

येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सुतार विभागाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड लागते. बंदी या लाकडापासून खुर्च्या, टेबल, डायनिंग टेबल, सोफासेट, शोभेच्या वस्तू आदी बनवितात. याच्या  विक्रीतून कारागृह विभागाला कोट्यवधी रुपये मिळत असतात. कारागृह विभागाला मनोरुग्णालयातील सागवान लाकडू दिले असते तर मनोरुग्णालय प्रशासनाला फायदा झाला असता. मात्र, ठेकेदाराच्या फायद्यासाठी निविदा तयार केली असून त्यांच्या मर्जीप्रमाणे अटी, शर्ती घातल्याचे दिसून येते.

सागवान लाकूड सर्व ऋतूमध्ये चांगल्या स्थितीत राहते. त्याला कीड किंवा वाळवी लागत नाही.  या लाकडाचे आयुष्य सहज शंभर वर्षे असते. येरवडा मध्यवर्ती कारागृह विक्री केंद्रात सागवान खुर्ची पाच ते सहा हजार रुपये तर डायनिंग टेबल वीस हजार रुपये तर सोफा सेट तीस ते पस्तीस हजार रुपये किंमत आहे. तर सिंगल व डबल बेडलासुद्धा चांगली किंमत मिळते. यासह लाकडी बेलन, चमचा, ट्रे आदी वस्तूंना अधिक मागणी असते.

जुन्या लोखंडी खाटा, तांब्याची भांडी गायब

येरवडा मनोरुग्णालयातील भांडार कक्षात अनेक जुन्या वजनदार लोखंडी खाटा होत्या. यासह तांब्याची भांडीही होती. या खाटा व तांब्याची भांडी कधी आणि कोणाला दिली, याचा पत्ता लागत नसल्याची चर्चा कर्मचारी वर्गामध्ये आहे. या वस्तूंची नोंद ठेवली असती तर वस्तू गेल्या नसत्या, असे त्यांचे म्हणणे आहे. शंभर वर्षांपूर्वीच्या ब्रिटीशकालीन अनेक मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याचे समोर आले आहे.

मनोरुग्णालयातील जुन्या इमारतीमधून मिळणारे फर्निचर, लोखंड आणि घडीव दगड संबंधित ठेकेदाराला मिळणार आहे. यातून पाडकामाचा खर्च वगळता मिळणाऱ्या अतिरिक्त रक्कम ठेकेदार सरकारी तिजोरीत ( ट्रेजरी) मध्ये जमा करणार आहे. 
- यू . टी. गिरी, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, येरवडा मनोरुग्णालय

 येरवडा मनोरुग्णालयाच्या नवीन इमारतींचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जुन्या ब्रिटिशकालीन इमारती पाडून त्या जागी नवीन इमारतींचे बांधकाम होणार आहे. जुन्या इमारती पाडल्यानंतर जुने सागवान लाकूड, लोखंड आणि घडीव दगड संबंधित पाडकाम करणाऱ्या ठेकेदाराला देण्याची अट निविदेत आहे.
- डॉ. सुनील पाटील, अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest