पाण्याअभावी पुणेकर चिडले

पुणे महापालिकेच्या शहरातील विविध भागातील जलकेंद्रांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी गुरुवारी (दि. १७) शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. शुक्रवारी (दि. १८) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले होते.

pune water

संग्रहित छायाचित्र

शहरात शुक्रवारीही अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत

पुणे महापालिकेच्या शहरातील विविध भागातील जलकेंद्रांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी गुरुवारी (दि. १७) शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. शुक्रवारी (दि. १८) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले होते. परंतु शहराच्या अनेक भागात पाणीच आले नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली. यामुळे पुणेकरांनी संताप व्यक्त केला.

महापालिकेने गुरूवारी खडकवासला जॅक्वेल (नवीन), नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र (५०० एमएलडी), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती एलएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट, लष्कर जलकेंद्र, भामा आसखेड जॅक्वेल, वडगाव जलकेंद्र परीसर, खडकवासला जॅकवेल वारजे फेज क्रमांक १ आणि २, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील एसएनडीटी, एचएलआर व टाकी परिसर चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, खडकवासला रॉ वॉटर, गणपती माथा व जुने वारजे जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) परिसर व चतु:श्रुंगी टाकी परिसर तसेच कोंढवे-धावडे जलकेंद्र व रॉ वॉटर येथील विद्युत/पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्यामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे जाहीर केले होते.

देखभाल दुरुस्तीचे काम झाल्यानंतर शुक्रवारी शहरात पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते. मात्र, ठरल्यानुसार पाणीपुरवठा करण्यात महापालिकेला अपयश आले. नागरिकांनी तक्रारीसाठी संबंधित वॉलमनला फोन केला असता ठरलेल्या वेळेपेक्षा थोड्या उशीराने पाणी येईल, असे सांगितले होते. परंतु रात्री उशिरापर्यंत पाण्याचा वाट पाहूनही  नळाला पाणीच आले नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

खराडी, वडगावशेरी, शहराच मध्यवर्ती भाग, दत्तवाडी परिसर, हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड आदी भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होण्यास उशीर झाला, तर काही ठिकाणी पाणीच आले नसल्याचे नागरिकांनी ‘सीविक मिरर’ला सांगितले. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest