सीईटी सेलकडून संकेतस्थळावर डॅशबोर्ड लावण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

अकरावी प्रवेशासारखी माहिती देणारा डॅशबोर्ड जाणीवपूर्वक उच्च आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचा सीईटीसेलच्या संकेतस्थळावर दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे प्रचंड नुकसान होत आहे.

CET Cell

सीईटी सेलकडून संकेतस्थळावर डॅशबोर्ड लावण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

नेमके किती प्रवेश झाले, किती जागा शिल्लक ही माहिती संशयास्पद; माहितीपासून विद्यार्थी, पालक राहतात अनभिज्ञ

अकरावी प्रवेशासारखी माहिती देणारा डॅशबोर्ड जाणीवपूर्वक उच्च आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचा सीईटीसेलच्या संकेतस्थळावर दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे नेमके कशामुळे सीईटी सेलला डॅशबोर्डचे वावडे आहे, असा प्रश्न आता विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केला आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलमार्फत दरवर्षी उच्च आणि तंत्रशिक्षणच्या व्यवसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. परंतु या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भातील पूर्ण माहिती विद्यार्थी आणि पालकांना दिली जात नाही.

सीईटी सेलमार्फत वेगवेगळ्या १९ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येत असलेल्या सीईटी परीक्षांना दरवर्षी तब्बल ११ लाखांवर विद्यार्थी बसतात. संबंधित विद्यार्थी अभियांत्रिकी, एमबीए, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी, बी. आर्च, एम. आर्च, विधी तीन वर्षे, पाच वर्षे, बी. प्लानिंग, एम. प्लानिंग, नर्सिंग, बीसीए, बीबीए, बीएमएस आदी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यासाठी केंद्रीय प्रवेश परीक्षा अर्थात कॅपच्या तीन फेर्‍या तसेच संस्थास्तरावरील कोटा प्रवेश आणि कॅप अगेन्स व्हॅकन्सी अशा फेर्‍या राबविण्यात येतात. परंतु याची सर्वकष माहिती विद्यार्थी आणि पालकांना दिली जात नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.

यासंदर्भात माहिती देतान पालक प्रतिनिधी राहूल गायकवाड म्हणाले, ‘‘राज्यात आरटीई प्रवेशापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. ती राबवत असताना संबंधित प्रवेश प्रक्रियेची माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून दिली जाते. तशीच माहिती काही प्रमाणात उच्च शिक्षण विभागामार्फत दिली जाते. गेली काही वर्षे दिली जात असलेली विधी प्रवेशाची माहिती यंदा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. तर गेली अनेक वर्षे तंत्रशिक्षण प्रवेशाच्या एकाही अभ्यासक्रमाची माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांना दिली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होत आहे. महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रियेमध्ये गोंधळ घातला जातो. खरी आकडेवारी पालक, विद्यार्थ्यांसमोर येणे आवश्यक आहे.’’

‘‘तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या इन हाऊस आणि मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेशाच्या माध्यमातून लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार केला जातो. त्यामुळे संबंधित प्रवेशांचा डॅशबोर्ड केला, तर पारदर्शकता येऊन त्याला आळा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच केवळ आर्थिक हित डोळ्यांसमोर ठेवूनच सीईटीसेल प्रवेश प्रक्रियेची त्रोटक माहिती संकेतस्थळावर देत असल्याचा आरोप पालक तसेच विद्यार्थी संघटना करत आहेत. त्यामुळे पुढील वर्षापासून तरी सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा डॅशबोर्ड उपलब्ध करून द्यावा,’’ अशी मागणी सम्यक फाऊंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक आनंद रणधीर यांनी केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest