पुण्यातील एकाही अभ्यासिकेचे फायर ऑडिट नाही, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात

पुण्यातील गांजवे चौकातील ध्रुवतारा या अभ्यासिका शनिवारी (दि. १९) लागलेल्या आगीत जळून खाक झाली. शहरात २५० हून अभ्यासिका आहेत. या अभ्यासिकेत लाखो विद्यार्थी अभ्यास करत असतात.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महापालिका आयुक्तांनी दिले तपासणीचे आदेश

पुणे : अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन आलेले लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासिकेत २४ तासापैकी किमान १५ तास बसून अभ्यास करत असतात. मात्र त्यांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे धक्कादायक वास्तव गांजवे चौकातील अभ्यासिकेला लागलेल्या आगीच्या निमित्ताने समोर आले आहे.

पुण्यातील गांजवे चौकातील ध्रुवतारा या अभ्यासिका शनिवारी (दि. १९) लागलेल्या आगीत जळून खाक झाली. शहरात २५० हून अभ्यासिका आहेत. या अभ्यासिकेत लाखो विद्यार्थी अभ्यास करत असतात.  या अभ्यासिकांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. शहरातील एकाही अभ्यासिकेने अग्निसुरक्षा लेखापरीक्षण (फायर ऑडिट)  करण्याचा साधा एकही अर्ज केला नसल्याची माहिती पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाच्या प्रशासनाने ‘सीविक मिरर’ला दिली. यावरून शहरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे स्पष्ट होत आहे.

दिल्लीत नागरी सेवा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या शिकवणी वर्गांचे (कोचिंग क्लासेस) केंद्र असलेल्या जुन्या राजेंद्रनगर भागातील राऊज आयएएस स्टडी सेंटरमध्ये तळघरातील ग्रंथालयामध्ये पाणी साचल्याने दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जुलै महिन्यात घडली होती. यावरून अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर दिल्लीसह देशातील प्रत्येक अभ्यासिकेने काय काय उपाययोजना केल्या आहेत? आपत्तीजनक घटना घडल्यास विद्यार्थी कसे सुरक्षित राहतील, याबाबत शासनाने धोरण तयार करण्याची आवश्यकता होती. मात्र शासनाच्या उदासीन कारभारामुळे विद्यार्थी जीव धोक्यात घालून अभ्यास करत आहेत.

पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुण्यात लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने राज्यातूनच नव्हे तर देशाभरासह परदेशातून येतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने कडक पावले उचलण्याचे धोरण आखण्याची गरज असल्याचे मत आता पुणेकरांकडून उपस्थित केले जाऊ लागले आहे. तर दुसरीकडे हेच विद्यार्थी भावी अधिकारी होणार आहेत. त्यांनीच स्वत: अभ्यासिकेत प्रवेश घेण्यापूर्वी आपण या ठिकाणी सुरक्षित असणार आहोत का, याची तपासणी करणे गरजेचे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

या आगीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सर्व लहान-मोठ्या अभ्यासिकांचे फायर ऑडिट होणे गरजेचे आहे. मात्र, पालिका प्रशासन त्यात अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. महापालिकेच्या या उदासीन कारभार संताप व्यक्त करत युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी शहरातील सर्वच अभ्यासिकांचे फायर ऑडिट करण्याची मागणी पुणे महापालिकेकडे केली आहे. तसेच युवासेनेकडून भरारी पथके नियुक्त करून अभ्यासिकेंना भेटी देत फायर ऑडिट करुन अहवाल महापालिकेला सादर केला जाणार आहे, असे यादव यांनी सांगितले.

...अन्यथा अभ्यासिका चालकांच्या विरोधात तीव्र आंदोलन
शहराच्य अनेक इमारती, जुन्या वाड्यांमध्ये लहान मोठ्या अभ्यासिका सुरू आहेत. जुन्या इमारतींचे कोणतेही फायर ऑडिट होत नाही. किंवा अभ्यासिकादेखील अग्निप्रतिबंध उपाययोजना करून घेत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात आहे. गांजवे चौक परिसरातील अभ्यासिकेला आग लागून अभ्यासिकेतील लॅपटॉप, पुस्तके, खुर्च्या आदी साहित्य जळून खाक झाले. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दीर्घ काळ अभ्यास करून काढलेल्या नोट्सदेखील जळून खाक झाल्या आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. विद्यार्थी राज्यातील विविध ठिकाणाहून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात येतात. त्यांना सुरक्षित वातावरणात अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शहरात सुरू असलेल्या अभ्यासिकांच्या माध्यमातून अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे. विद्यार्थ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या रकमेच्या तुलनेत त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा या तुटपुंज्या आहेत. त्यामुळे प्रत्येक अभ्यासिकेचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे, असे युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी नमूद केले. तसेच महापालिका प्रशासनाने येत्या आठवड्यात शहरातील सर्व अभ्यासिकांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण न केल्यास, विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या अभ्यासिका चालकांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

महापालिका प्रशासनाने काय करायला हवे?

- शहरातील अभ्यासिकांची नोंदणी करण्यासाठी एक धोरण तयार करावे

- केवळ शॉप अॅक्ट नोंदणी करून परवानगी देऊ नये.

- महापालिकेने अभ्यासिकांसाठी वेगळे निकष तयार करावे.

- फायर ऑडिटसह प्रत्यक्ष अभ्यासिकेत काय उपाय जना केल्या आहेत, याची तपासणी करावी.

- जुने वाडे, इमारतीमधील अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य आहे का, त्याची पाहणी करावी.

शहरातील सर्वच अभ्यासिकांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. प्रत्येक विभागाने दिलेल्या सूचनांनुसार अभ्यासिकांना उपाययोजना करणे बंधनकारक राहणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे.
- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त,  पुणे महापालिका

शहरातील प्रत्येक इमारतीचे फायर ऑडिट करण्याचे बंधन शासनाने घातले आहे. परंतु त्याचे पालन होताना दिसून येत नाही. इमारतीचा नेमका कशासाठी उपयोग करायचा आहे, ही माहिती द्यावी लागते, त्यासोबत फायर ऑडिट करावेच लागते. शासनाच्या अधिकृत एजन्सी नेमलेल्या आहेत. त्यांच्याकडून फायर ऑडिट करून घ्यावे लागते. मात्र शहरातील एकाही अभ्यासिकेने फायर ऑडिट केलेले नाही. फायर ऑडिट करून घेण्याची जबाबदारी ही संबंधित मालकाची असते.
- रमेश गांगड, साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest